साताऱ्यात पारंपारिक वाद्यांवर बंदी, गणेश मंडळे आक्रमक
व्यापाऱ्यांच्या निवेदनानंतर निर्णयाने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
सातारा – सातारा शहरात आज सार्वजनिक गणेश मंडळांना गणपती आगमनासाठी पारंपारिक वाद्ये वाजवण्यास मनाई केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. व्यापाऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर राजपथ मार्गावर वाद्ये वाजवण्यावर पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी बंदी आणताच कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
साताऱ्यात आज गणेश मंडळांच्या गणेश मूर्तीचा आगमन सोहळा सुरू असताना पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चांगलाच गोंधळ उडाला. व्यापाऱ्यांना एक न्याय आणि सार्वजनिक मंडळांना वेगळा न्याय का, असा सवाल उपस्थित केला जावू लागला आहे. गणेश मंडळांनी पारंपारिक वाद्ये आणली तरी बंदी घालण्यात आली आहे. आज 8 मंडळांना राजपथावर मिरवणुका काढण्यास बंदी घातली. काल या मिरवणुका काढण्यास परवानगी असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
व्यापाऱ्यांनी त्रास होत असल्याचे निवेदन पोलिसांना दिल्याने मिरवणुकास परवानगी नाकारल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. गणपती बसवायचे की नाही, असा सवालही आता मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत.