शिरवडेत दोन गटात रॉड, विटा, दगडाने तुंबळ हाणामारी : एकूण 19 जणांवर गुन्हा
कराड | शिरवडे येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुंबळ मारामारी झाली. यावेळी एकमेकांना लोखंडी रॉड, विटा, दगड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यामध्ये तीघे गंभीर जखमी झाले. शिरवडे येथे शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी तळबीड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यावरून दोन्ही गटातील 19 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकणात संदीप हणमंत जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अदिती सतीश जगदाळे, राजेंद्र किसन पाटील, सतीश तानाजी जगदाळे, निरंतर राजेंद्र पाटील, निखिल राजेंद्र पाटील, जयश्री दादासाहेब माने, विजय किसन पाटील, प्रमोद हिंदुराव जगदाळे, प्रसाद दादासाहेब देसाई यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शनिवारी रात्री किरण जगदाळे व निरंतर पाटील यांच्यात सुरू असलेली भांडणे सोडविण्यासाठी गेले असताना हणमंत जगदाळे यांच्यासह इतरांना संशयीतांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जुन्या भांडणाच्या वादातून ही मारहाण झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याउलट अदीती सतीश जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, किरण कृष्णात जगदाळे, दिनेश शंकर घाडगे, राजेंद्र बाबुराव जगदाळे, कृष्णत हणमंत जगदाळे, निलेश बाबुराव जगदाळे, कृष्णत संपत जगदाळे, सुशांत शिवाजी जगदाळे, कार्तिक कृष्णात जगदाळे, रामचंद्र गणपत जगदाळे आणि बाबुराव अंतू जगदाळे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयकांनी घरात घुसून लोखंडी रॉड, दगड, विटांनी मारहाण केल्याचे तसेच दगडफेक करून घराच्या काचा फोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक फौजदार दिनकर काळे तपास करीत आहेत.