उध्दव ठाकरे यांचा शिंदे- पवारांवर हल्लाबोल : भाजपने आमच्यातील नालायक चोरले

हिंगोली | निवडणुकी जवळ आल्या की सबका साथ, सबका विकास असे म्हणतात आणि निवडणुका झाल्या की सबको लाथ दोस्तो का विकास म्हटले जाते. एनडीएची बैठक निवडणुका आल्याने घेतली गेली आहे. भाजपाला स्वतःचा पक्ष वाढवता आला नाही. सगळी गद्दार एकत्रित केली, आमच्यातील सगळे नालायक चोरलेत, असा घणाघाती आरोप शिंदे व अजित पवार गटावर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला. हिंगोली येथे जाहीर सभेत ते बोलत होते.
उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील जाहीर सभेतून आमदार संतोष बांगर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “ज्या गद्दाराला आपण नाग समजून पूजा केली, उलट तोच आपल्यालाच डसायला लागला. तुला पुंगी वाजवली तुला दूध पाजलं. मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याला हिंदुत्ववादी मानायचे का, उद्धटपणा येथे चालणार नाही”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बांगर यांचा समाचार घेतला.
भाजपमध्ये आयाराम तुपाशी, कार्यकर्ते उपाशी
शिवसेना 25 ते 30 वर्षे भाजप सोबत युतीत होते. त्यावेळी आमच्यासोबत भाजपचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज आम्हाला किव वाटते. या कार्यकर्त्यांनी भाजपसाठी आयुष्य झिजवले. आज सतरंज्या उचलाव्या लागत आहेत. त्यांनी मेहनत करुन भाजप हा पक्ष मोठा केला. परंतु तेच कार्यकर्ते आज उपाशी राहिले असून तूपशी मात्रा आयाराम झाले आहेत. यासाठीच तुम्ही भाजपसाठी मेहनत घेतली होती का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विचारला.