कराड, पाटणला अवकाळी पावसाने झोडपले : ऊसतोड मजूरांच्या झोपड्यात पाणी
कोळे प्रतिनिधी- ओंकार देशमुख
कराड आणि पाटण तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ऊसतोड मजूरांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक ऊसतोड मजूरांच्या झोपड्यात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना चांगला असल्याने शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.
कराड आणि पाटण तालुक्यात बुधवारी रात्रभर अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे ऊसतोड मजूरांना फटका बसला असून झोपडीत पाणी शिरून त्याच्या धान्य भिजले आहे. पाऊसाचे प्रमाण नुकसानकारक असल्याने पुढील दोन दिवस ऊसतोडीवरही याचा परिणाम जाणवणार आहे. अनेक ठिकाणी शेतात चिखल झाल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
अवकाळी पावसामुळे कोळे, तांबवे, सुपने, विंग, काले, उंडाळे भागासह पाटण तालुक्यातील विहे, मल्हारपेठ, तळमावले भागातही ऊसतोड मजूरांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचे पाणी साचल्याचे दिसत आहे. या पावसामुळे हवेत गारवा असून सकाळी 9 वाजताही काही भागात पाऊस कोसळत होता.