वडगाव हवेली @83 : ग्रामपंचायतीचा वाढदिवस 83 वर्षांच्या जेष्ठांनी केक कापून केला साजरा

कराड | आज काल सर्वत्र वाढदिवसाची वेड वाढत असताना दिवसे दिवस वाढदिवसाचे स्वरूप हे बदलत आहे. आजपर्यंत आपण लहान मोठ्या नेत्यांचा कार्यकर्त्यांचा वाढदिवस झालेले पाहिले आहे आणि ऐकले आहे. परंतु सातारा जिल्ह्यातील कराड मधील वडगाव हवेली गावांमध्ये चक्क 83 वर्षांच्या ज्येष्ठांनी केक कापून ग्रामपंचायतीचा वाढदिवस साजरा केला. यावेळी केक कापणाऱ्या जेष्ठांचा सन्मान ही करण्यात आला.
वडगाव हवेली (ता. कराड) या ग्रामपंचायतीला आज 83 वर्षे पूर्ण झाले आहेत. या 83 वर्षात आजपर्यंत गावाने अनेक आव्हाने पेलली आहेत. त्या त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे बदल घडवत गावाचा विकासात्मक बदल घडवून आणला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात 1940 साली गावाला ग्रामपंचायतीच्या दर्जा मिळाला. यानंतर स्वातंत्र्य लढ्यातील गावांमधील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी सहभाग घेतला होता. गावची राजकीय पार्श्वभूमी ही मोठी असून गावचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री दिवंगत दादासाहेब जगताप यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली परिसराचा कायापालट केला. आज दहा हजार लोक वस्ती असणारे व शेती हा प्रमुख व्यवसाय असलेले सदन गाव म्हणून परिसरात वडगांवची ओळख आहे. गावचे पहिले सरपंच म्हणून दिवंगत बंडू गोपाळा जगताप यांना बहुमान मिळाला होता. आज पर्यंत झालेल्या सर्व सरपंच व गाव कारभाऱ्यांनी गावचा विकास साधला आहे.
सध्याचे लोकनियुक्त सरपंच राजेंद्र जगताप, युवा नेते शिवराज जगताप व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. गावातील 1940 च्या दरम्यान जन्म घेतलेल्या आणि वयाची 83 वर्षे पूर्ण केलेले जेष्ठांचा सन्मान करण्याचे ठरवले. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ लोकांना निमंत्रित करत यतोचित सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना झाडाचे रोप भेट देणेत आले. तसेच यावेळी या ग्रामपंचायतीच्या वाढदिवसानिमित्त 83 वर्षाच्या जेष्ठ लोकांच्या हस्ते केक कापून आनंद व्यक्त करणेत आला. यावेळी गावातील जेष्ठ नागरिकांसह ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. या अनोख्या वाढदिवसाची चर्चा मात्र दिवसभर परिसरात होती.



