कर्नाटकात विजय काँग्रेसचाच, मात्र ऑपरेशन कमलाची भीती : पृथ्वीराज चव्हाण
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा हमखास विजयी होणार आहे. परंतु केवळ स्पष्ट बहुमत मिळवून चालणार नाही. तर त्यापेक्षा 10 ते 12 जागा जादा मिळविल्या पाहीजेत. अन्यथा कर्नाटकात ऑपरेशन कमलाची भीती असल्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
कर्नाटक येथे स्टार प्रचारक म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सध्या प्रचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी कर्नाटकात काँग्रेसच विजय होणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसला बहुमतासाठी आवश्यक 112 जागा मिळणार आहेत. परंतु कर्नाटक, मध्यप्रदेश मध्ये ज्या पद्धतीने यापूर्वी आमदारांना राजीनामा द्यायला लावून सदस्य संख्या कमी केली. त्याप्रमाणे ऑपरेशन कमलाची भीती पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीला पृथ्वीराज चव्हाणांचा खोचक टोला
गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचा पुढचा मुख्यमंत्री होईल असे म्हटले होते. यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडीत ज्या पक्षाचे बहुमत असेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. वंचित चे बहुमत असेल तर त्यांचा पुढचा मुख्यमंत्री होईल असे म्हटले आहे.