उंब्रज पोलिसांच्या सतर्क रात्रगस्तीमुळे चोरटा जेरबंद : मुद्देमाल जप्त
उंब्रज | उंब्रज (ता. कराड) येथील पोलिसांच्या सतर्क रात्र गस्तीमुळे मोटरसायकल तसेच मोबाईल चोरटा जेरबंद करण्यास उंब्रज पोलिसांना यश आले आहे. दिनकर शामराव साळुंखे (वय-30, रा. येराड, ता. पाटण) असे सदर चोरट्याचे नाव आहे.
याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सतर्क रात्रगस्त करण्याबाबत दिलेल्या सूचनेनुसार रविवार दि. 14 मे रोजी उंब्रज येथील बाजारपेठेतील मारुती मंदिर परिसरात पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, पोलीस हवालदार देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल माने असे रात्रगस्त करत असताना त्यांना एक इसम मारुती मंदिराच्या अडोशास संशयीतरित्या लपून बसल्याचे आढळून आले. दरम्यान त्याच्याकडे अधिक विचारणा केली असता त्याने त्याचे नाव दिनकर शामराव साळुंखे असे सांगितले. तसेच त्यावेळी त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक (एमएच- 11- सीएफ- 484) व दोन मोबाईल संदर्भात माहिती विचारली असता त्यास समाधानकारक माहिती देता आली नाही.
संबधित संशयित व्यक्तीने सदरची मोटरसायकल तसेच दोन मोबाईल या वस्तू कराड येथून चोरल्याची कबुली दिली आहे. आरोपीस पुढील कारवाई करता कराड शहर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, पोलीस हवालदार सचिन देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल श्रीधर माने, पोलीस मित्र स्वप्नील मोरे, गौरव खवळे यांनी केली आहे.