आवाज शामगावकरांचा : शेतीच्या पाण्यासाठी कॅण्डल मोर्चा, थाळीनाद अन् 151 शेतकऱ्यांचे मुंडण
मुंबईत पती- पत्नीने मुंडण करत दिला उपोषणाला पाठिंबा
कराड | विशाल वामनराव पाटील
साताऱ्यातील कराड तालुक्यात असणाऱ्या शामगाव येथे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतरही पाणी मिळत नसल्याने गेल्या तीन दिवसापासून गावकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. पाण्याच्या मागणीसाठी गावातील सर्व महिला, शेतकरी नागरिकांनी काल रात्री कॅण्डल मोर्चा काढला. तसेच 151 शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंडण केले असून या आंदोलनाची तीव्रता वाढू लागली आहे. शासनाने शामगावकरांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा टोकाचे आंदोलन करू अशा इशारा सुद्धा आंदोलकांनी दिला आहे. आरोग्य विभागाने अशोक सुर्यवंशी या उपोषणकर्त्याला तब्बेत खालवल्याने उपचारासाठी हलविले आहे.
देव दर्शन करत राम कृष्ण हरीचा गजराने अमरण उपोषणास सुरुवात
शामगावच्या चारी बाजुंनी शेतीचे पाणी आले, पण आमचे गाव वंचीत राहीले पाणी देण्यासाठी 31 अक्टोंबरची अखरेची मुदत शासनाला ग्रामस्थांनी दिली होती. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर अमरण उपोषणास सुरुवात केली. उपोषणाच्या प्रारंभी शिव शंभो महादेवाचे दर्शन घेऊन श्री औकनाथ, ज्योतिर्लिंग, हनुमान,विठ्ठल रुक्मिणी,आदि देवाचे दर्शन घेतले.त्यानंतर गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी गावातून टाळकरी माळकरी ग्रामस्थ यांनी राम कृष्ण हरीचा गजर केला. उपोषणकर्ते सरपंच विजय पाटोळे, कराड तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य भिमराव डांगे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य अशोक सुर्यवंशी एम. डी. जाधव, शिवराज पोळ आदी उपोषणाला बसलेले आहेत.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 151 शेतकऱ्यांचे मुंडण
शामगाव येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न संदर्भात अमरोण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 151 शेतकऱ्यांनी मुंडण केले. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, हिंद केसरी संतोष वेताळ, वडोली निळेश्वरचे विजत पाटील, निलेश पवार, नडीशीचे रविंद्र थोरात, वहागावचे अनिकेत पवार, तसेच पाचूंदचे ग्रामस्थांनी भेट दिली. उपोषणस्थळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे आर. वाय. रेडिआर यांनी उपोषण स्थळी भेट देवून उपोषण कर्ते यांना सांगितले की तुमचा पाण्या संदर्भात सकारात्मक प्रस्ताव पाठविला उपोषण थांबवावे अशी विनंती करतो त्यावेळी ग्रामस्थ आणि उपोषण कर्ते यांनी लेखी दिल्या शिवाय उपोषण थांबवणार नसल्याचे सांगितले.
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली तरी औषध उपचार नाकरले
शेतीला पाणी मिळण्यासाठी सुरू असलेल्या अमरण उपोषणाच्या तिसरा दिवशी 3 उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावली असून त्यांनी औषध उपचार घेण्यास नकार दिली. पाणी मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असे त्यांनी डॉ.एम. पी. मिरजे, डॉ. एस. पी. फाळके यांना सांगितले. तिसऱ्या दिवशी महिलांनी गावात फेरी काढून थाळी नाद केला. गावातील सर्व महिला एकत्र येऊन त्यांनी ताट आणि पळी घेऊन गावाला प्रदक्षिणा घालत थाळी नाद केला. दुपारी 3 वाजता नायब तहसीलदार बाबुराव राठोड, मंडल अधिकारी एस. जी. मर्ढे, तलाठी एस. एम. पिसाळ यांनी उपोषण कर्त्यांची माहिती आणि पाण्याची परिस्थिती जाणून घेतली.
मुंबईत पती- पत्नीने मुंडण करत दिला उपोषणाला पाठिंबा
शामगावच्या शेतीच्या पाणी प्रश्नासाठी मुंबईत कामानिमित्त असलेल्या पोळ दाम्पत्यांनी मुंडण करत पाठिंबा दिला आहे. शेतीला पाणी मिळावे म्हणून मुंबईत राजेंद्र पोळ आणि त्याच्या पत्नी मनिषा पोळ यांनी मुंडण करुन शासनाचे लक्ष वेधले.
कॅण्डल मोर्चात… आवाज कुणाचा शामगावकरांचा
शेतीच्या पाणी प्रश्नासाठी शामगाव पूर्ण एकवटला असून दररोज वेगवेगळी कृती करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. शुक्रवारी रात्री गावातून महिला, युवक, शेतकरी नागरिकांसह बच्चेकंपनीनी कॅण्डल मोर्चात सहभाग घेतला. यावेळी कोण म्हणतंय देत नाही…घेतल्याशिवाय राहत नाही. पाणी आमच्या हक्काचे,,, नाही कोणाच्या बापाचे. आवाज कुणाचा… शामगावकरांचा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.