शाब्बास मुली : हेळगावच्या स्वरूपाची वन पोलीस, पोलीस व आर्मी या तीन्ही क्षेत्रात निवड, आर्मीत जाणार
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
कुटुंबीयांचे स्वप्न साकार केल्याचा सार्थ अभिमान बाळगत ध्येय, जिद्द, चिकाटीच्या जोरावर हेळगाव (ता. कराड) येथील सुकन्या कु. स्वरूपा आनंदराव मोरे हिने तिन्ही क्षेत्रात यशाला गवसणी घातली आहे. वन पोलीस, पोलीस व आर्मी अशा क्षेत्रात तिला संधी प्राप्त झाली असून देश सेवेला प्राधान्य देत आर्मीमध्ये जाण्याचा निर्धार तिने केला आहे.
स्वरूपाचे हिचे आई- वडील शेती, मोल मजुरी करतात. मात्र, घरच्या परिस्थितीची जाण ठेवत स्वरूपाने स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) मध्ये निवड झाली आहे. संपूर्ण भारतामधून ओपनसह सर्व जातीमधून सुमारे 250 मुली व 1900 मुलांची निवड झाली. ती बीएसएफ (BSF) मध्ये भरती होणारी ही हेळगावची दुसरी मुलगी आहे. तिने पोलीस भरतीसाठी दिलेल्या परीक्षेत तिची वेटिंगवर निवड झाली असून 2 सप्टेंबरला डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी तिला बोलावण्यात आले आहे. वन पोलीस परीक्षेतही तिने यश मिळवले असून त्याची फिजिकल टेस्ट बाकी आहे. त्यामुळे वन पोलीस, पोलीस व आर्मी या तिन्ही क्षेत्रात तिने यश संपादन केले असून आर्मीच्या माध्यमातून देश सेवेला प्राधान्य देण्याचा मनोदय तिने व्यक्त केला आहे.
स्वरूपाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हेळगावला झाले. बीकॉम पर्यंतचे उच्च माध्यमिक शिक्षण कराडच्या एसजीएम कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये असताना तीन वर्षे एनसीसीचे प्रशिक्षणही तिने पूर्ण केले होते. माझ्या यशात आई-वडिलांसह चुलते अधिकराव मोरे, नवनाथ मोरे, बहीण धनश्री तिनेही जॉब करत डिप्लोमाचे प्रशिक्षण घेतले. मला महत्वपूर्ण मार्गदर्शन व विशेष सहकार्य केले. देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याने माझ्या जीवनाचे सार्थक झाल्याचे स्वरूपाने सांगितले. या निवडीबद्दल तिचे हेळगावसह परिसरातून कौतुक होत आहे