पंढरपूरला आषाढीला जाताना सातारा जिल्ह्यातील भाविकांची गाडी पलटी
सातारा | साताऱ्यातून – पंढरपूरला आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या बोलेरो गाडीला अपघात झाला आहे. सातारा जिल्ह्यातील लोधवडे येथे आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला असून यात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजत आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, लोधवडे (ता. माण) जवळ पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बोलेरो गाडी क्रमांक (एमएच- 11 बीएच- 0896) या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बोलेरो गाडी पूर्णपणे पलटी झाली असून चालक कल्याण भोसले (वय- 45), अण्णा गाढवे (वय- 42), पप्पू भिसे (वय- 40), दादासाहेब थोरात (वय- 42), सागर भोसले (वय- 45), विजय माने (वय- 45), श्रीमंत पवार (वय- 50), रुद्र भोसले असे आठ जण प्रवास करत होते. त्यातील सहा जणांना गंभीर इजा झाली आहे. यातील एकाला गंभीर दुखापत झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील गुजरवाडी (ता. कोरेगाव) येथून सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पंढरपूरला काहीजण दर्शनासाठी निघाले होते. माण तालुक्यातील लोधवडे याठिकाणी 8 वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडी पलटी होवून हा अपघात झाला आहे. घटनास्थळी परिसरातील लोकांनी तात्काळ धाव घेत जखमींना धीर दिला आहे. तसेच काहींना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.