सुपने येथे उद्या महिला व पुरूषांच्या निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान : पश्चिम महाराष्ट्रातील पैलवानाची मांदियाळी
– विशाल वामनराव पाटील
सुपने (ता. कराड) येथील पांडुरंग देवाच्या यात्रेनिमित्त उद्या रविवारी (दि. 8 ऑक्टोंबर) दुपारी दोन वाजता महिला व पुरूषांच्या निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवछत्रपती कुस्ती केंद्र सुपने व यात्रा कमिटी सुपने यांच्याकडून देण्यात आले आहे. या कुस्ती मैदानात पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पैलवानाच्या हजारों रूपयांच्या कुस्त्या होणार आहेत.
या मैदानात पहिल्या क्रमांकाची 75 हजार रुपयांची कुस्ती पै. दिग्विजय जाधव (सुपने) आणि पै. शशिकांत बंगार्डे (कोल्हापूर), द्वितीय क्रमांकाची 70 हजारांची कुस्ती पै. अक्षय मोहिते (कराड) आणि पै. लिंगराज होनमाने (कोल्हापूर), कुस्ती क्रमांक 3 ते 6 या पै. साहिल पाटील (सुपने) आणि पै. प्रसाद चव्हाण (पुणे), पै. रणजीत राजमाने (सैदापूर) आणि पै. सागर चौगुले (कोल्हापूर), पै. गौरव हजारे (कोपर्डे- पुणे) आणि पै. आबा शेंडे (कोल्हापूर), पै. आण्णा पाटील (कोल्हापूर) आणि पै. ऋषिकेश पाटील (कोल्हापूर) या चार कुस्त्या 50 हजार रुपये इनामाची होणार आहे. पै. सुजित चव्हाण (सुपने) आणि पै. सुमित शेलार (कवठेमहाकाळ) ही कुस्ती 35 हजार इनामाची होणार आहे. तर पै. निखिल पाटील (सुपने) आणि पै. चेतन कोळी (ऊपरी), पै. प्रथमेश पाटील आणि पै. रोहित पाटील (वाठार) यांच्यामध्ये 25 हजार रुपये इनामाची कुस्ती होईल. यासोबत 10 नंबरची कुस्ती पै. सुजल कांबळे आणि पै. प्रदीप जाधव (किल्ले मच्छिंद्रगड) यांच्यात 20 हजार रुपये इनामाची कुस्ती होईल.
या कुस्त्यांचे उद्घाटन पै. आबासाहेब पाटील, पै. बजरंग पवार, पै. अनिल बानगुडे, पै. जगन्नाथ गायकवाड, पै. रामचंद्र पाटील, पै. भागवत कांबळे, पै. भीमराव कुंभार यांच्या हस्ते होणार आहे. या कुस्त्यांच्या मैदानावर महिला कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत सुपने ग्रामपंचायत येथे कुस्त्या जोडल्या जातील. कुस्त्यांचे मैदान ग्रामपंचायत सुपने येथे असणार आहे.