तुम्ही माझे घर फोडले, मी तुमची युती फोडणार : आ. शशिकांत शिंदे
शिंदे- फडणवीस यांना जाहीर आव्हान

सांगली | राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांचे भावाने काल शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे एक भाऊ राष्ट्रवादी तर दुसरा भाऊ शिवसेनेत पहायला मिळणार आहे. परंतु सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे मानले जातात. अशावेळी माथाडी नेते ऋषिकांत शिंदे यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याने शशिकांत शिंदे यांनी फडणवीस- शिंदे यांच्या युतीलाच जाहीर आव्हान दिले.
विटा (जि. सांगली) येथे खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा बुथ कमिटी पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी आमदार अरुण लाड, माजी आमदार सदाशिव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील उपस्थित होते. या मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्यातील सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, तुम्ही माझ्या भावाला पक्षात घेतले. माझे घर फोडले आहे, मी त्यांची युती फोडून दाखवतो.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, आज सरकारकडून सांगलीत जयंत पाटील, कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांना लक्ष्य केले आहे. मात्र, आम्ही घाबरणार नाही. राज्यात आणि देशात दबावाचे राजकारण करण्यात येत आहे. भाजपकडे स्वतःची ताकद नाही. आमच्या राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांना आयात करून त्यांनी पक्ष वाढवला आहे. आम्हांला आमिषे दाखवली जातील, परंतु आम्ही दबावाला बळी पडत नाही.