साताऱ्यात 17 व्या शतकातील ऐतिहासिक रांजण सापडला : छ. उदयनराजेंनी दिल्या सूचना
सातारा | ऐतिहासिक तख्ताचा वाड्याजवळ 17 व्या शतकातील एक ऐतिहासिक रांजण आढळून आला आहे, हा रांजण मातीमध्ये अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आहे. या तख्ताच्या वाड्याचे तीनशे वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी बांधकाम केले होते. वाड्याच्या आठ एकरापैकी बहुतांशी जागेवर सध्या अतिक्रमण झाल्याने केवळ साडेतीन एकरच वाडा शिल्लक राहिला आहे. याठिकाणी ऐतिहासिक रांजण आढळून आल्याने नगरपालिकेने गुरुवार बाग परिसरातील समाज मंदिराचे काम तात्काळ थांबवावे अशा स्पष्ट सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्या आहेत.
तख्ताचा वाडा परिसरातील ऐतिहासिक ठेवा वाचवण्याकरता या समाज मंदिराला परवानगी देण्यात येऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा साताऱ्यातील इतिहास प्रेमींनी तसेच माजी उपनगराध्यक्ष सुहासराजे शिर्के व अरबाझ शेख यांनी दिला आहे. वाड्याच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने उरलेल्या साडेतीन एकरच्या जागेला वाचवण्यासाठी इतिहास प्रेमींची धडपड सुरू आहे. सदर वाड्याच्या जागेमध्ये नगरपालिकेने समाज मंदिराला परवानगी दिल्याचे जिल्हा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अरबाज शेख यांना समजले. या कामाला त्यांनी हरकत घेत याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले होते. तसेच त्यांनी या प्रकाराची कल्पना खासदार उदयनराजे भोसले यांना दिली उदयनराजेंनी तात्काळ गुरुवार बाग येथील तख्ताच्या वाडा परिसराला भेट दिली. यावेळी रवींद्र झुटिंग, माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, जिज्ञासा विकास मंच निलेश पंडित, अरबाज शेख इत्यादी उपस्थित होते.
या पाहणी दरम्यान येथे 17 व्या शतकातील एक ऐतिहासिक रांजण आढळून आला आहे, हा रांजण मातीमध्ये अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आहे. यावरूनच या जागेचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात येत असताना मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनीही परवानगी दिलीच कशी असा खडा सवाल सुहास राजे शिर्के यांनी केला आहे. शिवाजी संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी सुद्धा या जागेची पाहणी केली. या रांजणावर संशोधन केल्यानंतर त्यांच्या अधिक तपशील उजेडात येतील असे त्यांनी सांगितले, मात्र ऐतिहासिक तख्ताच्या वाडा परिसरात बांधकामांना परवानगी मिळते कशी? अशी खाजगी बांधकामे करून जर ऐतिहासिक ठेवा नष्ट केला. तर त्याचे परिणाम वाईट होतील. या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के यांनी दिला आहे.