ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

मंत्र्याच्या पोरानं 27 व्या वर्षी लिहिले पुस्तक : मुंबईत ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’चे प्रकाशन

मुंबई | महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी लिहिलेल्या ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी, 17 मार्च 2023 रोजी विधानभवनातील समिती कक्षात संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते, तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’चे प्रकाशन करण्यात आले. आजच्या डिजिटल युगातील मानवी जीवनातील आव्हांनाकडे तत्त्वज्ञानात्मक प्रश्न म्हणून पाहात सकारात्मक दिशा दाखवणाऱ्या या पुस्तकाबद्दल यशराज देसाई यांचे सर्व मान्यवरांनी यावेळी अभिनंदन केले.

स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून यशराज देसाई यशस्वीपणे काम करत आहेत. त्यांच्यातील अभ्यासू व विचारशील नेतृत्वाची ओळख पाटण तालुक्यास झाली आहे. त्यांनी वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी लिहिलेले ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ हे पुस्तक माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात जीवनाकडे पाहण्याच्या त्यांच्या अनोख्या सम्यक दृष्टीचा परिचय करून देणारे आहे. यावेळी यशराज देसाई यांनी हे पुस्तक लिहिण्यामागील आपली भूमिका मांडली. मोबाईल, त्यावरील समाजमाध्यमे, त्यावरून लिखित तसेच ऑडिओ-व्हिडीओ स्वरूपात होणारा माहितीचा प्रचंड मारा यांनी एक आभासी जग तयार झाले आहे. आता प्रत्येक व्यक्ती हे आभासी जग आणि वास्तव जग असे दुहेरी जीवन जगताना दिसते. यात माणसाच्या खऱ्या भावभावना, त्याचे श्रेयस, त्याच्या इच्छा-आकांक्षा, मानवी नाती या साऱ्यांपुढे डिजिटल आव्हान उभे राहिले आहे. या आव्हानाला सामोरे जाताना, आभासी आणि वास्तव जगातला तोल, बॅलन्स कसा सांभाळायचा, याचे तात्त्विक चिंतन ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ या पुस्तकात मांडले आहे. लवकरच हे पुस्तक अमेझॉन, किंडल आणि पुस्तकाची प्रकाशनसंस्था असलेल्या एपीके प्रकाशनाच्या संकेतस्थळावर, तसेच क्रॉसवर्ड स्टोअरमध्ये उपलब्ध होईल.

याप्रसंगी महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, शिवसेना पक्ष प्रतोद भरतशेठ गोगावले, आमदार अनिल बाबर, बालाजी कल्याणकार, महेंद्र दळवी, भिमराव तापकीर यांच्यासह अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, तसेच मंत्रालयातील विविध वरिष्ठ अधिकारी आणि एपीके प्रकाशनचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker