प्रतिपंढरपूर कोळेत ज्ञानेश्वरी पारायणाचा सुवर्णमहोत्सव : संत घाडगेनाथ महाराजांचा १६२ वा समाधी सोहळा
कोळेत २५ ऑक्टोबरपासून विविध धार्मिक कार्यक्रम

कोळे (हॅलो न्यूज) – श्री क्षेत्र प्रतिपंढरपूर कोळे (ता. कराड) येथे श्री संत घाडगेनाथ महाराज यांच्या १६२ व्या समाधी सोहळ्यानिमित्त आणि श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या ५० व्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रविवार दि. २५ ऑक्टोबर ते रविवार दि. १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत अखंड श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, हरिकीर्तन, प्रवचन, भजन आणि हरिपाठ अशा भक्तिमय उपक्रमांची रेलचेल असणार आहे.
सोहळ्यात दररोज पहाटे ४ ते ६ या वेळेत काकड आरती, सकाळी ६.३० ते १० या वेळेत श्री ज्ञानेश्वरी वाचन, सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत हरिकीर्तन, दुपारी १.३० ते ३.३० या वेळेत महिला भजनी मंडळाचे भजन, दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत श्री संत घाडगेनाथ महाराज चरित्र वाचन, सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत हरिपाठ, ५.३० ते ६.३० या वेळेत प्रवचन, रात्री ७ ते ९ या वेळेत हरिकीर्तन आणि रात्री ९.३० ते ११.३० या वेळेत संगीत भजन असे नित्य कार्यक्रम होणार आहेत.
या सोहळ्यात ह.भ.प. विशाल महाराज खोले, ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर, ह.भ.प. हरिप्रसाद महाराज देहूकर (मालक), ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी (पैठण) यांच्यासह नामवंत कीर्तनकार व फडपरंपरेतील मालक मंडळी कीर्तनसेवा सादर करणार आहेत. तसेच दादामहाराज तुळसणकर यांचे प्रवचन होणार आहे. शनिवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता श्री संत घाडगेनाथ महाराज यांचा समाधी सोहळा संपन्न होणार असून, यावेळी आरती, पुष्पार्पण आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन ह.भ.प. सोमनाथ महादेव वाणी, ह.भ.प. शिवलिंग जगन्नाथ वाणी (मठाधिपती, श्री संत घाडगेनाथ मंदिर, कोळे) आणि ग्रामस्थ मंडळ, कोळे यांच्यावतीने करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



