कराडजवळ ऊसाने भरलेली ट्रॉली पलटी; आईचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी
मलकापूर (हॅलो न्यूज ), : कराडजवळील मलकापूर शहरातील ढेबेवाडी फाट्याजवळ ऊसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रॉलीखाली सापडलेल्या मालन मोहन सुतार (वय -६०, रा. काढणे, ता. पाटण) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा यशवंत मोहन सुतार (वय -२८) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूरमधील ढेबेवाडी फाट्याजवळ ऊसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक पलटी झाली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या दोन दुचाकींसह काहीजण ट्रॉलीखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. उसाच्या ढिगाऱ्याखालून एका दुचाकीस्वाराला बाहेर काढण्यात यश आले.
दरम्यान, ट्रॉलीखाली आई मालन सुतार आणि मुलगा यशवंत सुतार हे दोघेही अडकले होते. नागरिक आणि पोलिसांनी युद्धपातळीवर बचावकार्य करत दोघांना बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत मालन सुतार यांचा मृत्यू झाला, तर यशवंत सुतार जखमी झाला. त्याला तातडीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे मलकापूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. अपघातानंतर नगरसेवक सुरज शेवाळे, दादासाहेब शिंगण, धनंजय येडगे यांच्यासह कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, वाहतूक शाखेचे प्रभारी संदीप साळुंखे, महामार्ग पोलीस निरीक्षक अमृत बाबर, अशोक भापकर, निखिल मगदूम, आमदार अतुल भोसले यांच्या सोशल मीडियाचे ओमकार देशमुख यांच्यासह पोलिस, नागरिकांनी बचावकार्य केले.



