तुकाराम मुंढेच्या कार्यक्रमाविषयी कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची माहीती
पालकमंत्र्याच्या पाठपुराव्याला यश जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश

कराड (हॅलो न्यूज) – कराड नगरपरिषदेच्या शारदीय व्याख्यानमालेतील सातवे पुष्प गुंफण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे तरुणाईशी संवाद साधण्यासाठी कराडमध्ये येत आहेत. या व्याख्यानाला तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, अपेक्षित गर्दीचा विचार करून नगरपरिषदेने कृष्णाबाई घाटावरील वाळवंटात व्याख्यानाचे आयोजन करण्याचे नियोजन सुरू केले होते. मात्र, राज्य शासनाने कराड तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर आर्थिक काटकसर करणे आणि अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.
शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल), कराड येथे हे व्याख्यान होणार आहे. उपस्थितांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मुख्य प्रेक्षागृहासह लगतच्या सभागृहात तसेच टाऊन हॉल परिसरात नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. परिसरात स्क्रीन लावून नागरिकांना व्याख्यानाचा लाभ घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
यावेळी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी नागरिकांना शक्यतो खासगी वाहनांऐवजी पायी येण्याचे आवाहन केले आहे. वाहनाने येणाऱ्या नागरिकांसाठी दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था साई मंदिरासमोरील प्रवेशद्वारातून विठामाता विद्यालयात, तर चारचाकी वाहनांसाठी शिवाजी विद्यालयात करण्यात आली आहे. नागरिकांनी आपली वाहने टाऊन हॉल परिसरात आणू नयेत, पार्किंगसाठी निश्चित केलेल्या ठिकाणीच वाहने लावावीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने व्याख्यानाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.
मलकापूर नगरपरिषद सेवा संकल्प अभियान संपन्न :- श्री.मनोहर भास्करराव

मलकापूर (हॅलो न्यूज)- केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांचे निर्देशानुसार सेवा संकल्प अभियानाअंतर्गत मलकापूर नगरपरिषदेने जिल्हा
परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र, काले, नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, मलकापूर-आगाशिवनगर तसेच कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट मलकापूर, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सेवा दवाखाना, मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक 10 ऑक्टोंबर, 2026 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.00 या वेळेमध्ये शहरातील नागरिक व नगरपरिषद कर्मचारी यांची आरोग्य तपासणी शिबीर भारती विद्यापीठ यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, मलकापूर येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. सदर शिबीराचे उद्घाटन कराड तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती सुनिता थोरात, मुख्याधिकारी श्री.कपिल जगताप यांचे शुभहस्ते करणेत आला. सदर वेळी महाराष्ट्र राज्य कामगार विमा सेवा दवाखाना डॉ.रेणुका काळभोर व त्यांचे सहकारी, काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मेडिकल ऑफिसर डॉ.सायली डोंगरे, नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, मलकापूर व आगाशिवनगर येथील डॉ.प्रज्ञा ठिगळे, डॉ.भारती मस्कर, सौरभ सुतार, रविकिरण सुतार, सौ.सुलोचना पावणे, श्री.पन्हाळे व त्यांचे सहकारी तसेच मलकापूर शहरातील आशा सेविका तसेच मलकापूर नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक /नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या शिबीरामध्ये एकूण 250 कर्मचारी व नागरिक यांनी लाभ घेतला. तसेच स्वा.सै.स्व.भास्कररावजी शिंदे यांचे पुण्यतिथीचे औचित्य साधून गांधी फौंडेशन व मा.मनोहर शिंदे मित्र परिवार यांचे संयुक्त विद्यमाने मोफत काढलेल्या एकूण 1450 आयुष्यमान व आभा कार्डचे वाटप करणेत आले. सदरचे शिबीर यशस्वी करणेसाठी मलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री.तेजस सोनावले, नियोजन व विकास समिती सभापती श्री.सुरज शेवाळे, बांधकाम सभापती श्री.हणमंतराव जाधव, सार्व. आरोग्य (वैद्यक), शिक्षण व क्रिडा समिती सभापती श्री.धनंजय येडगे तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.गितांजली पाटील, उपसभापती सौ.गिता साठे, नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.कपिल जगताप, आरोग्य विभाग प्रमुख श्री.धनंजय थोरात, पाणीपुरवठा विभाग प्रमुख श्री.प्रसाद पाटील, कार्यालय अधिक्षक श्री.अभिजीत ढाणे व वरिष्ठ लिपिक श्री.ज्ञानदेव साळुंखे, शहर समन्वयक श्री.पुंडलिक ढगे, लिपिक श्री.रमेश बागल, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
सातारा जिल्ह्यातील पाटणसह पाच तालुक्यांच्या दुष्काळी यादीत समावेश – पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या पाठपुरावा यश

दौलतनगर (हॅलो न्यूज): सातारा जिल्ह्यातील पाटण, वाई, सातारा, जावली,कराड आणि कोरेगाव या तालुक्यांचा दुष्काळी क्षेत्रात समावेश करून शेतकऱ्यांना दुष्काळी उपाय योजनांचा लाभ देण्यासंदर्भात सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार राज्य शासनाचे मदत व पुनर्वसन विभागाने सन 2026 च्या खरीप हंगामातील विविध तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहिर करुन विविध उपाय योजना व सवलती लागू करण्या संदर्भात शासन निर्णय पारित केला असून दुसरी कळ (ट्रिगर 2) मध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण, वाई, सातारा, जावली,कराड आणि कोरेगाव या तालुक्यांचा दुष्काळी क्षेत्रात समावेश करून शेतकऱ्यांना दुष्काळी उपाय योजनांचा लाभ देण्यासंदर्भातला शासन निर्णय पारित झाला आहे.
सह्याद्री कृषी महाविद्यालयात ‘नशा मुक्ती शपथ’ संपन्न

कराड (हॅलो न्यूज) :- युवा पिढीला व्यसनाधीनतेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि सशक्त समाज निर्मितीसाठी सह्याद्री कृषी महाविद्यालय यशवंतनगर, कराड येथे राष्ट्रीय सेवा योजना एकक अंतर्गत नशा मुक्ती अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या निर्देशानुसार, ‘नशामुक्त भारत अभियाना’ला गती देण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील राठोड यांनी तरुण पिढीवर होणाऱ्या नशेच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकला आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले. वाढती व्यसनाधीनता ही देशाच्या विकासातील मोठी अडचण असून, युवकांनी या मोहिमेचे दूत बनून कार्य करणे गरजेचे आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. या अभियानाचा मुख्य भाग म्हणून महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे सेवन न करण्याची आणि आपल्या परिसरात व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करण्याची सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.



