वडोलीतील युवकाच्या खून प्रकरणात 3 जणांना पोलिस कोठडी
कराड | येथील कार्वेनाका परिसरात पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शनिवारी भरदिवसा युवकावर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आला. याबाबतची फिर्याद मयत शुभमचे वडील रविंद्र दत्तात्रय चव्हाण (रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) यांनी कराड शहर पोलिसात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तिघांना आज न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शुभम रविंद्र चव्हाण (वय- 22, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर याप्रकरणी मुबिन पैगंबर इनामदार (रा. कार्वेनाका, कराड), रिझवान गौस शेख (रा. कोणेगाव, ता. कराड), निहाल अस्लम पठाण (रा. सुमंगलनगर, कार्वेनाका, कराड) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादीचा मयत मुलगा शुभम याचे बीएससी पर्यंत शिक्षण झाले आहे. त्याचे येथील वडार नाका चौकातील चर्च समोर सलूनचे दुकान आहे. शनिवारी सकाळी शुभम आणि त्याचा भाऊ हिम्मत हे दोघे दुचाकीवरून कराडात सलून दुकानात आले. त्यानंतर फिर्यादी दुपारी एक वाजता शुभम व हिम्मतचा डबा घेऊन दुकानात आले. त्यावेळी शुभमचा मित्र रिझवान शेख हा दुकानात होता. त्यानंतर रिझवान शेख व निहाल पठाण याने संगणमत करून शुभम यास कार्वे नाका येथे घेऊन गेले. दुपारी 2.50 वाजणेच्या सुमारास कार्वेनाका येथे मुबिन इनामदार याने पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून शुभम याच्याशी वाद करून त्याचेवर चाकूने गळ्यावर, मानेवर, पाठीवर, पोटावर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर मुबिन याने घटनास्थळावरून पलायन केले होते.
पोलिसांनी रिझवान शेख व निहाल पठाण या दोघांना रात्री उशिरा ताब्यात घेतले. मुबिन फरार झाल्यानंतर त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली होती. पोलिसांना मुबिन हा मलकापूर येथील एका शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुबिन याला रात्री दोन वाजता एका शेतातून ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर रविवारी सकाळी मुबिन इनामदार, रिझवान शेख, निहाल पठाण या तिघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत