कराडमध्ये शिवरायांना 350 ढोल- ताशांची मानवंदना : शिवराज्यभिषेक सोहळा दिवस

कराड | छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे हे 350 वे वर्ष आहे. यानिमित्त हिंदू एकता आंदोलनच्यावतीने कराडमध्ये रविवारी साडेतीनशेवे हिंदू साम्राज्य वर्ष साजरे करण्यात आले. यावेळी दत्त चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास भगव्या ध्वजाची, तसेच साडेतीनशे ढोल-ताशांची मानवंदना देण्यात आली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास 2023 मध्ये तब्बल साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त हिंदू एकता आंदोलनाचे प्रांतीय अध्यक्ष विनायक पावसकर, संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जिरंगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष रुपेश मुळे यांनी या हिंदू साम्राज्याच्या साडेतीनशेव्या वर्षानिमित्त रविवार, दि. 29 रोजी सायंकाळी येथील शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास भगवा ध्वज आणि साडेतीनशे ढोल-ताशांच्या गजरात अनोखी मानवंदना दिली. या सोहळ्यात हिंदू एकतासह असंख्य शिवप्रेमी, तरुण, महिला, नागरिक सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांनी ‘छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय, भवानी जय शिवाजी, हर हर महादेव आदी. घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. तसेच शिवरायांच्या पुतळ्याभोवती भगवे झेंडे, आकर्षक लेझर शो, बॅनर लावल्याने संपुर्ण परिसरातील वातावरण शिवमय झाले होते.
हिंदू साम्राज्याच्या साडेतीनशेव्या वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार हिंदू एकता आंदोलनने आयोजित केलेल्या या अनोख्या सोहळ्यास शिवप्रेमी, नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. यावेळी हिंदू एकता आंदोलनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, असंख्य शिवप्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी, विनायक पावसकर व विक्रम पावसकर यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, दत्त चौकातील या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. तसेच वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला होता.