जुने फर्निचर विक्रीच्या नावाखाली रेठऱ्यातील युवकाची 90 हजाराची फसवणूक
कराड | केंद्रीय राखीव दलात अधिकारी असल्याचे सांगत सोशल मीडियावर फोटो पाठवून जुने फर्निचर विक्री करण्याच्या नावाखाली 90 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याबाबत रेठरे खुर्द (ता. कराड) येथील प्रशांत प्रकाश पाटील यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून संतोषकुमार नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेठरे खुर्द येथील प्रशांत पाटील हे घरामध्ये असताना त्यांचा मित्र गणेश सपकाळ त्यांच्याकडे आला. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोलीस उपअधीक्षक विक्रम साळी यांचा मेसेज आला असून सीआरपीएफ अधिकारी संतोषकुमार यांचे फर्निचार विक्री करायचे असल्याचे सांगण्यात आले होते. बदली झाल्यामुळे संतोषकुमार हा ते फर्निचर कमी किमतीत विकणार होता. प्रशांत पाटील यांनी गणेश सपकाळ याच्या मोबाईलमध्ये फर्निचरचे फोटो पाहिले. त्यांना ते फर्निचर आवडले. त्यामुळे संतोषकुमार याच्याशी संपर्क साधून त्यांनी त्या वस्तू खरेदी करणार असल्याचे सांगितले.
संबंधित वस्तूंची किंमत 90 हजार रुपये असल्याचे संतोषकुमार याच्याकडून सांगण्यात आले. त्यानुसार प्रशांत पाटील यांनी 90 हजार रुपये आॅनलाईन पाठवले. मात्र, त्यानंतरही संतोषकुमार याने गणेश सपकाळ याच्या मोबाईलवर फोन करून आणखी 15 हजार 500 रुपयांची मागणी केली. संशय आल्यामुळे गणेश यांनी पोलीस उपअधीक्षक विक्रम साळी यांना फोन करून संबंधित मेसेजबाबत विचारणा केली. मात्र, त्यावेळी उपअधिक्षक साळी यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचे सांगून आणखी पैसे देवू नका, अशी सुचना केली. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशांत पाटील यांनी याबाबतची फिर्याद कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर तपास करीत आहेत.