पुसेसावळी परिसरात केबल खुदाईमुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांचे हाल
पुसेसावळी | खटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरात ऑफ्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी केलेल्या साईड पट्ट्यांच्या खोदकामामुळे जागोजागी खड्डे पडल्याने व काढलेली चर व्यवस्थित न मुजवल्याने दगडमातीचे ढीग पडले आहेत. या ढिगातील खडीमिश्रित माती कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे राज्य मार्गालगत पसरल्याने घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून
या रस्त्यावरून मोठी वाहने गेली की डोळ्यात धुरळा जात असल्यामुळे ग्रामस्थ व वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
तरी संबंधित कंत्राटदाराने हे काम करत असताना नियम धाब्यावर बसवून काम करणे सुरूच ठेवले आहे. तर काही ठिकाणी उकरलेली माती आहे, तशीच ठेवली जाते. त्यात रात्रीच्यावेळी जेसीबीच्या साहाय्याने चर काढतात व केबल टाकून झाल्यावर जेसीबीनेच ती बुजवतात. त्यामुळे अनेक ठिकाणी दगड व मातीचे ढीग तसेच पडलेले आहेत, तर केबलचा जोड असतो, त्याठिकाणी चेंबरसाठी काढलेले मोठे खड्डे रात्रीच्या वेळी धोकादायक ठरत आहेत.
चोराडे ते पुसेसावळी मार्गावरील नांदणी पुलाच्या बाजूला असणाऱ्या साईट खोदलेल्यामुळे या साईट पट्टीवरून गाडी घसरून शेनवडी येथील वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या रस्त्याच्या साईट पट्ट्या खोदलेल्या मुजवताना डांबरी रस्त्यावरील रिप्लेक्टर निघालेली असून याबाबत संबंधित प्रशासनाने या रस्त्याची पाहणी करून साईट पट्ट्या व डांबरी रस्त्यावरील झालेली दुरुस्ती करून घ्यावी.
कंत्राटदाराचा हलगर्जीपणा विलास पिसाळ
केबलसाठी चर खोदणाऱ्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यालगत दगड-माती पसरली गेली असल्यामुळे शाळकरी मुलांच्या सायकली व वाहन चालकांच्या दुचाकी घसरण्याच्या घटना घडत आहेत. वाहनाच्या वर्दळीने गावामधील व्यावसायिकांसह प्रवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चोराडे सोसायटीचे माजी सदस्य विलास पिसाळ यांनी सांगितले.