आम्ही शरद पवारांच्या पाठीशी : खा. श्रीनिवास पाटील
कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय केल्याची माहिती प्रसारमाध्यमातून समजली. ती धक्कादायक होती. मात्र, पवार साहेब जो काही निर्णय घेतील तो योग्यच असेल. आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी असू. केवळ निवडणूक न लढवण्याचा किंवा पक्षीय पदावर न राहण्याचा त्यांचा मानस दिसतोय. परंतु संस्थात्मक कामे, रचनात्मक कामे, युवा पिढीला मार्गदर्शन हे साहेब करतच राहणार असल्याची प्रतिक्रिया खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, आम्ही दोघांनी 1958 पासून युवक कॉंग्रेसमधून सुरूवात केली. त्यांनी सलग 65 वर्षे केलेली समाजसेवा, त्यातील 55 वर्ष लोकप्रतिनिधित्व केल्यानंतर आता पुढच्या पिढीसाठी काहीतरी करण्याचा साहेबांची इच्छा दिसतेय. त्यामुळे ते सांगतील ते धोरण आणि जे बांधतील ते तोरण हिच आमच्या सारखा कार्यकर्त्याची भूमिका राहिल. फक्त ते पदावर राहणार नाहीत असे दिसून येत आहे.
शरद पवार यांचे नेतृत्व केवळ पद आणि निवडणुका पुरते मर्यादित नसून ते व्यापक व्यक्तिमत्व आहेत. पुढच्या पिढीला काहीतरी भरीव देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, जबाबदारी असलेल्या संस्थांना अधिक प्रभावी करण्यासाठी ते जास्त वेळ देणार आहेत असे वाटते. याचा अर्थ ते पूर्णपणे निवृत होतायतं असे नाही. कुठतरी राजकारणा पलीकडे जाऊन काम करण्याचा निर्णय साहेबांचा दिसतोय. त्यामुळे आम्ही सर्व त्यांचे मार्गदर्शन घेत राहू. महाभारतात श्री कृष्णाने मी शस्त्र हातात घेणार नाही असा पण केला होता. मात्र जागेवर बसून मार्गदर्शन केले तरी सुध्दा युध्दात चमत्कार घडवून आणला होता. पवार साहेब असेच आमचे उत्तुंग नेते आहेत. नुसते जागेवर बसून व मार्गदर्शन करूनही कलाटणी घडवण्याची ताकद त्यांच्यामधे आहे. मात्र त्यांनी अचानकपणे घेतलेल्या निर्णयासंदर्भात त्यांच्याशी भेटून चर्चा केल्यानंतरच अधिक सांगता येईल, अशी भावना खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली.