पुणे- बंगलोर महामार्गावर 6 वाहनांचा विचित्र अपघात : 1 ठार 3 जखमी
सातारा। पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काशीळ गावच्या हद्दीत रात्री 11 वाजण्याच्या सुमारास 6 वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये मालट्रक उलटल्याने एका 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. अपूर्व संतोष जाधव (वय- 14, रा. भणंग, ता. जावळी, जि. सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भणंग येथील जाधव आणि पवार कुटुंबीय सुटीसाठी कोकणात फिरण्यासाठी गेले होते. रविवारी रात्री कारने हे कुटुंबीय परत यायला निघाले. काशीळ गावच्या हद्दीत त्यांची कार आली. त्यावेळी त्यांच्या समोर असलेल्या मालट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे दुभाजकाला धडकून मालट्रक उलटला. परंतु मालट्रकमध्ये असलेली चण्याची पोती पाठीमागून येत असलेल्या कारवर पडली. यात चालकाच्या पाठीमागे बसलेला अपूर्व जाधव हा त्याखाली सापडला. या अपघातानंतर बोरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारमधून बाहेर काढले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अपूर्वचा मृत्यू झाला. तर इतर ३ जणांना किरकोळ स्वरूपाची जखम झाली. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
या अपघाताची फिर्याद चारचाकी चालक सुनील शिवाजी लोखंडे (रा. आदर्शसंगम अपार्टमेंट, संगमनगर सातारा) यांनी पोलिसात दिली असून, ट्रकचालक सेल्लूदुराई एम. (रा. नामाक्कल, तमिळनाडू) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार प्रविण शिंदे व प्रकाश वाघ करत आहेत.