Karad News : तासवडे टोलनाक्यावर कत्तलीसाठी नेताना 12 जनावरे पकडली
कराड | तासवडे (ता. कराड) येथे टोलनाक्यावर गोवंश वाहतूक करणारा आयशर टेम्पो गोरक्षकांनी तळबीड पोलिसांच्या मदतीने पकडला. पकडलेल्या आयशर टेम्पो मध्ये गाई, बैल, लहान वासरे अशी एकूण 12 गोवंशीय जनावरे दाटीवाटीने भरण्यात आली होती. माणद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी या कारवाई विषयी माहिती दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, परळी खोऱ्यातून एका एजंटामार्फत जनावरांची विक्री केली जात होती. ही जनावरे पेडगाव इस्मालपूर येथील कत्तलखान्यात कत्तलीसाठी घेवून जात असल्याची माहिती गोरक्षकांना बातमी दारांमार्फत मिळाली. त्यानंतर गोरक्षकांनी तासवडे येथे धाव घेऊन तळबीड पोलिसांचे सहकार्य घेतले. आज मंगळवारी सकाळी एक आयशर टेम्पो मिळून आला. टेम्पोची तपासणी केली असता गाई, बैल, लहान वासरे अशी एकूण 12 गो-वंशीय जनावरे दाटीवाटीने भरण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी सदरचा टेम्पो, 12 जणावरे व टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
सदरची कारवाई संग्राम माळी, वैभव जाधव, समाधान करपे, प्रकाश माळी, आदित्य माळी, महेश जाधव, तुषार निकम, रोहित साळुंखे, अतुल निकम तसेच तळबीड पोलीस ठाण्याचे शहाजी पाटील, ओंबासे यांनी केली.