Satara News : पोलिसांची अवैध गुटख्या विरोधात धडक कारवाई, 21 जण ताब्यात
सातारा : सातार्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने अन्न व औषध प्रशासनाला बरोबर घेत धडक कारवाई केली आहे. शहरात अवैधरित्या पान टपर्यांवरील विक्री करण्यात आलेला गुटखा संबंधित सुमारे 20 टपरी चालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे 2 लाखांचा गुटखा शहर परिसरातून हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात अवैध गुटख्याची विक्री होत असल्याबाबतची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळत होती. याबाबत वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी (दि. 12) रोजी डीबी पथकास कशा प्रकारे कारवाई करावी, याबाबत सूचना देवून शहरातील गोल मारुती मंदिर, राजवाडा परिसर, मंगळवार पेठ, जुना मोटर स्टँड, राधिका चौक, करंजे नाका, आंदळकर चौक येथील विविध पान टपर्यांवर छापे मारले.
या छाप्यांमध्ये शहरातील विविध पान टपर्यांमधील सुमारे 2 लाख रुपये किंमतीचा अवैधरित्या विक्रीस ठेवलेला गुटखा जप्त करण्यात आला. यामध्ये विमल, आरएमडी सह अन्य गुटख्यांचा समावेश आहे. शाहूपुरी पोलिसांनी शहरात केलेल्या या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्री करणार्या रॅकेटचे मात्र धाबे दणाणले आहेत आणि शहरातील सुजाण नागरिकांनी या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले आहे.