कराड- पाटण मार्गावर भरधाव ब्रिजा गाडी 3-4 पलटी मारत घुसली घरात : चालक ठार
एसटी महामंडळातील चालकाचा मृत्यू

पाटण | कराड- पाटण रस्त्यावर मल्हारपेठजवळ आबदारवाडी (ता. पाटण) गावच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने एकजण ठार झाला आहे. भरधाव चारचाकीने तीन- चार पलटी घेतल्यानंतर गाडी कमानी शेजारील घरात घुसली. या अपघातात घराचे तसेच गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सागर दिनकर माथणे (वय- 35, रा. नाडे) हा युवक ठार झाला असून विशाल हणमंत पानस्कर (वय- 24, रा. मल्हारपेठ) हा गंभीर जखमी झाला आहे. सागर हा पाटण आगारात चालक म्हणून पदावर नोकरीला होता.
मल्हारपेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी, सागर माथणे व विशाल पानस्कर हे दोघे मित्र ब्रिजा गाडी क्र (MH- 50 -L- 1700) मधून नाडे नवारस्ता येथून निसरे फाट्याकडे निघाले होते. मात्र, गाडीचा वेग जास्त असल्याने चालक सागर माथणे याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी रस्ता सोडून कडेला असलेल्या लोखंडी बोर्डला धडक देऊन आबदारवाडीच्या कमानीला धडकली. परंतु ही धडक एवढ्या जोराची होती की गाडीने तीन-चार पलटी मारून कमानी शेजारील घरात घुसली. या अपघातात चालक सागर माथणे याच्या डोक्याला व हाताला जोराचा मार लागला. त्यांना कराड येथे उपचारासाठी तात्काळ हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सागर माथणे याचा मृत्यू झाला, तर विशाल पानस्कर हा देखील गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून घराचेही मोठे नुकसान झाले आहे. पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास पो.ह.एन.के.कांबळे करत आहेत.
सागर माथणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाटण आगारात चालक म्हणून नोकरीस होते. त्यांच्या निधनाने नाडेगावासह पाटण आजारातील कर्मचाऱ्यांमध्ये दुःखाची छाया पसरली. त्यांच्या अंत्यविधीसाठी परिसरातील ग्रामस्थांसह पाटण आगाराचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरची घटना रविवारी दि. 18 रोजी रात्री घडली.