रेकॉर्ड ब्रेक गर्दी : माऊलीच्या सोहळ्यात लोणंदला मुस्लिम समाजाने जपली सामाजिक बांधिलकी
लोणंद। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लोणंद शहरात विसावला असताना लोणंद मुस्लिम समाजाचे वतीने सामाजिक बांधिलकी जपत सर्व धर्म समभावची भावना वृद्धि व्हावी व सामाजिक भाईचारा वाढावा या हेतूने रखरखत्या उन्हात उभ्या असलेल्या दर्शन रांगेतील माऊली भक्तांना तसेच वारकरी बांधवांना पाणी बाॅटल्सचे वाटप करत मोठा दिलासा दिला.
लोणंद मुस्लिम जमाआत वतीने पाणी बाॅटल वाटप करुन एक चांगला संदेश जनमानसात देत जातीय द्वेष पसरविणाऱ्या समाज कंटकांना चपराक दिली आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातील नागरिकांकडून वाहवा होत आहे. या उपक्रम यशस्वीतेसाठी लोणंद मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक महंमदभाई कच्छी, मुस्लिम जमाआतचे कायदेशीर सल्लागार महाराष्ट्र शासन नोटरी ॲड. विलायत उर्फ बबलूभाई मणेर, विश्वस्त कय्युम मुल्ला, राजुभाई इनामदार, जब्बार पटेल, शाहनवाज पानसरे, हिमालय फाउंडेशनचे सचिव जाविद पटेल, ज्येष्ठ मार्गदर्शक कय्युमभाई बागवान, युसूफ मुलाणी, पापा पानसरे, आकिब कच्छी, शाहरुख कच्छी, बबलू कच्छी, अमर आतार, आज्जो सय्यद, मस्जिद आतार, नुरमहंमद कच्छी, सोनु सय्यद, शाहिद कच्छी आदी समाजबांधव उपस्थित होते.
याची देह याची डोळा अनुभवला माऊलीचा आनंद सोहळा
टाळ, मृदुंगाचा निनाद करत माऊली जयघोषात लोणंद करांनी रात्र जागून काढली. खेळणी, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी लहान मुले व महिलांनी गर्दी केली होती. छोटे- मोठे साहित्य खरेदी करण्यासह माऊलीच्या दर्शनाचा आनंद लुटला. पावसाने दडी मारल्यामुळे भाविकांनी माऊलीला पाऊस पडून दे, अशी साद घातली. पालखी सोहळ्यामध्ये माऊलीचा जयघोष करत लोणंद करांनी रात्र जागून काढली. दिंडी – दिंडीतून येणारे अभंग, भुपाळ्या, गवळणी, वासुदेव, आंधळे – पांगळे, गुरुपरंपरेचे अभंग आदींचे मंगलमय सूर संपूर्ण वातावरणात हा सोहळा अधिकच नयनरम्य झाला.