निवडणुका ऑक्टोंबर महिन्यात, तर दुष्काळी भागाला पाणी डिसेंबरला : देवेंद्र फडणवीस
टेंभू उपसा सिंचन योजनेला 2 हजार कोटी रूपये
सातारा | जोपर्यंत पाणी येत नाही, तोपर्यंत निवडणूकीला उभा राहणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती. निवडणूक ऑक्टोंबर 2024 ला होणार तर डिसेंबर 2024 पाणी दुष्काळी भागात येणार. पैशाची कमतरता पडणार नाही कारण मुख्यमंत्र्यांनी तिजोरीची चावी माझ्याच हातात दिली आहे. मागच्या सरकारला निर्णय लकवा होता. त्यांचा पेनच चालत नव्हता, असा उध्दव ठाकरेंना टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
दहिवडी (जि. सातारा) येथे उपमुख्यमंत्री जाहीर सभेत बोलत होते. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह. तु. धुमाळ, अधीक्षक अभियंता जयंत शिंदे आदी उपस्थित होते.
टेंभू उपसा सिंचन योजनेला 2 हजार कोटी रूपये
टेंभू उपसा सिंचन योजनेला 1 महिन्याच्या आत 2 हजार कोटी रूपयाची मान्यता देवू. त्यातून 8 टीएमसी पाणी 41 हजार हेक्टर क्षेत्राला मिळेल. कराड, कवठेमहाकाळ, सांगोला, माण- खटाव, आटपाडी, सातारा व सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी देवू. पाच वर्षानंतर माणदेशीच्या दुष्काळावर कोणीही कांदबरी लिहणार नाही, कारण आम्ही दुष्काळमुक्त करून दाखवू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
म्हसवडची एमआयडीसी चोरीला गेली होती
आपण कपडे, सोने, बॅंग चोरीला गेली ऐकलं पण अडीच वर्षाच्या काळात म्हसवडची एमआयडीसी चोरी गेली. चोरांच सरकार आहे, आता तुम्ही आमची एमआयडीसी परत करा. या भागातील सर्वात मोठी एमआयडीसी आम्ही करतोय. या भागातल्या सामान्य युवकाच्या हाताला काम मिळेल.