रोखठोक : पाटण मतदार संघावर शिवसेनेचा (ठाकरे गट) दावा कि वादा
विशेष लेख | विशाल वामनराव पाटील
शिवसेनेची (ठाकरे गट) तोफ असलेले संजय राऊत उद्या पाटण तालुक्याच्या दाैऱ्यावर येत आहेत. तळमावले येथे जाहीर सभा होणार असून आता संजय राऊत सरकार आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर काय बोलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. संजय राऊत आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये सगळ्याचा समाचार घेणार हेही तितकेच खरे आहे. परंतु आगामी काही महिन्यावर येवून ठेपलेल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या सभेकडे पाहिले जात आहे. तेव्हा पाटण विधानसभा मतदार संघावर शिवसेना (ठाकरे गट) आपला दावा सांगणार की वादा (राष्ट्रवादीला) देणार?
राज्यात शिवसेना फुटीनंतर 40 बंडखोर आमदारांना पाडण्यासाठी महाविकास आघाडी विशेष लक्ष देत आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व पाटण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांना पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित प्रयत्न करणार आहे. अद्याप कोण- कोणती जागा घेणार याविषयी राज्यात फाॅर्म्युला ठरलेला नाही. पाटण विधानसभा मतदार संघात कधीही भाजपाचा आमदार झाला नाही. या मतदार संघात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचाच दबदबा राहिलेला आहे. सन 2014, 2019 च्या निवडणुकीत विधानसभेला राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकरांना पराभूत करून शंभूराज देसाई यांनी शिवसेनेतून आमदारकी मिळवली. अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर गृहराज्य मंत्रीपदही घेतले. मात्र, महाविकास आघाडी असतानाही आणि आत्ताही एक तिढा कायम राहिलेला आहे, तो म्हणजे पाटण मतदार संघावर दावा कोणाचा?. आता याठिकाणी शिवसेना कि राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून लढणार? पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बंडखोरी केली, ते महाविकास आघाडीतून बाहेर स्वतंत्र झाले, तरीही तो तिढा आजही सुटलेला नाही. कारण पाटण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांचेही कार्यकर्ते व नेते स्पष्ट भूमिका घेताना सध्यातरी दिसत नाहीत. अशावेळी या मतदार संघावर शिवसेना दावा सांगणार की (राष्ट्रवादीला) वादा देणार याकडे पाटणचेच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
पाटण विधानसभा मतदार संघात तीनवेळा राष्ट्रवादीचा म्हणजेच पाटणकरांचा पराभव झाला आहे. तर शंभूराज देसाई यांनी शिवसेना पक्षाच्या तिकीटावर विजय मिळवला आहे. आता शंभूराज देसाई (शिवसेना -शिंदे गट) आणि राष्ट्रवादीतून सत्यजित पाटणकर हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार हे ठरलेल आहे. शिवसेना (उध्दव ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष भानुप्रताप ऊर्फ हर्षद कदम यांची व गटाची भूमिकाही तितकीच महत्वाची ठरणार आहे. अशावेळी पाटण मतदार संघ सोडणार का? सोडणार नसेल तर मग महाविकास आघाडी कसा तिढा मिटवणार? या प्रश्नाची सोडवणूक करताना शिवसेना पाटण मतदार संघावरील आपला दावा सांगणार की राष्ट्रवादीला मदत करण्याचा वादा करणार हे येणारा काळ ठरवेल. मात्र, अशावेळी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचे नसेल, पाटण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीने आणि शिवसेना (उध्दव ठाकरे गट) वरिष्ठ नेत्यांनी मत विचारात घेवूनच निर्णय घेणे अपेक्षित आहे. पाटण तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे मुख्य टार्गेट हे शंभूराज देसाई यांचा पराभव करणे हे आहे. त्यामुळे शिवसेना दावा सांगणार की वादा देणार हे नेतेही आणि वाचकही जाणून आहेत.
पाटण विधानसभा मतदार संघात विधानसभेची तयारी
पाटण मतदार संघात गेल्या 20 दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी दाैरा केला. दोन दिवसापूर्वी साईगडे (ता. पाटण) येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले होते. आता रविवारी दि. 25 रोजी संजय राऊत तळमावले (ता. पाटण) याठिकाणी जाहिर सभेसाठी येत आहेत. या सर्वांच्या दाैऱ्यामुळे आगामी विधानसभेची तयारी सुरू झाल्याचे पाटण वासियांना पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे या मल्हारपेठ येथे येवून जाहीर सभा घेतल्या. तेव्हा त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर हल्लाबोल केला होता. आता संजय राऊत कसा समाचार घेणार याकडे लक्ष लागून आहे. या सर्व सभा होत असताना शंभूराज देसाई यांनी मात्र, आपण कुस्तीसाठी तयारीतच आहोत, असे म्हणत यापूर्वीच खुले आव्हान दिले आहे.