कराड उत्तरमध्ये पुढचा आमदार भाजपाचाच असणार : धैर्यशील कदम
मोदी @ 9 व महाजनसंपर्क अभियानांतर्गत बुद्धिजीवी संमेलन
मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी
हणबरवाडी -धनगरवाडी योजनेला सुधारित मान्यता देऊन योजना मार्गी लावली. विभागातील अपूर्ण योजनाही येत्या 5-6 महिन्यात पूर्णत्वास नेण्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. कराड उत्तरच्या विद्यमान आमदारांना 25 वर्षे संधी दिली, तरीही मतदार संघातील योजना अपूर्ण आहेत. आता आमदार बदलायची वेळ आली असून मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी आगामी निवडणुकीत कराड उत्तरमध्ये भाजपचाच आमदार असणार असल्याचा विश्वास कराड उत्तरचे भाजप नेते, वर्धन ॲग्रो कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी मसूर येथे शुभारंभ कार्यालयात मोदी @ 9 व महाजनसंपर्क अभियानांतर्गत बुद्धिजीवी संमेलनात मार्गदर्शन करताना केले.
यावेळी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, सुरेश पाटील, सातारा जिल्हा सरचिटणीस महेंद्रकुमार डुबल, भीमराव पाटील, कराड तालुकाध्यक्ष सौ. अंजली जाधव, कराड उत्तर तालुकाध्यक्ष महेश जाधव, उपाध्यक्ष जयवंतराव जगदाळे, प्रतापराव जगदाळे, सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, जागृत ग्राहक राजा संघटनेचे राज्य संघटक दिलीप पाटील यांच्यासह विभागातील महिला, कार्यकर्ते, माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामकृष्ण वेताळ म्हणाले, कराड उत्तरमध्ये भाजपाची ताकद वाढवण्यासाठी आम्ही सक्षम झालो आहोत. विविध योजना प्रत्यक्षात साकारत आहेत. विशेषता राज्यातील बारा कोटी जनतेला आरोग्य विमा देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झाले आहे. आणखी भरीव विकास कामांसाठी कराड उत्तरमध्ये भाजपचा आमदार पाहिजे. यावेळी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसह विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अंत्योदय हेच ब्रीदवाक्य, सशक्त शेतकरी समृद्ध भारत, भारतातील अमृत पिढी सक्षमता, नारी तू नारायणी, महिला सक्षमीकरण, राज्यांचा विकास, सांस्कृतिक वारसाचे युग आदि विषयावर विचारमंथन झाले. भाजपच्या सातारा जिल्हा सचिव दिपाली खोत यांनी प्रास्ताविक केले. कराड उत्तर तालुका सरचिटणीस शंकरराव शेजवळ यांनी सूत्रसंचालन केले. युवराज चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल जगदाळे, राजेंद्र लोहार, प्रज्योत कदम, सयाजी शिंदे, जितेंद्र मोरे, संदीप चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.