उंडाळेत रात्रीत 3 ठिकाणी धाडसी चोरी : सायरन वाजला डाव फसला
कराड । कराड दक्षिणच्या डोंगरी भागात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून मंगळवारी रात्री उंडाळे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर तीन ठिकाणी घरफोड्या केल्या. चोरट्यांच्या दुर्दैवाने त्याच्या हाती काही लागले की नाही याची अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. चोरट्यानी बंद घरे लक्ष करत डोंगरी भागात गेल्या आठवड्यात 15 ठिकाणी घरफोडी करून सोने- चांदी व आर्थिक रक्कम लंपास केली होती. त्यानंतर तब्बल आठ दिवसाच्या आतच उंडाळे येथे मंगळवारी रात्री चोऱ्या करण्याचा धाडसी प्रयत्न केला. अशावेळी उंडाळे विभागातील पोलिस तालुक्यावरूनच आपला कारभार हाकत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
उंडाळे येथील रोहित शेवाळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील साहित्याची नासधूस करत घरातील काही रक्कम लंपास केली आहे. याशिवाय उंडाळे येथील बाजारपेठेत असणाऱ्या वेदपाठक ज्वेलर्सवर ही दरोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. चोरट्यांनी ज्वेलर्सच्या शटरचे दाराचे कुलूप तोडल्यानंतर शटर उघडताच सायरन वाजल्याने चोरट्याने तेथून धूम ठोकली. चोरटे ओमनी गाडीतून आले होते. त्यांनी उंडाळे पोलीस स्टेशनच्या नजीक सागर पाटील यांची रेसरची सायकल चोरून नेली. चोरट्यानी चोरी केलेले ठिकाण पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असून उंडाळे येथे पोलिस हजर नसल्याने असे घडत आहे.
उंडाळे पोलिस ठाण्याचे कारभारी शोधायची वेळ
उंडाळे येथे पोलीस दुरुक्षेत्र असूनही या दुरक्षेत्रात पोलिसांची हजेरीच नसते. त्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावले आहे, सध्या उंडाळे पोलीस स्टेशनमध्ये पूर्वी असणारे पोलीस कॉन्स्टेबल व फौजदार यांच्या बदल्या झाल्या असून या ठिकाणी अद्याप कोणाची नियुक्ती केली आहे. याबाबत विभागातील जनतेला माहिती नसून पोलीस ही जनतेशी संपर्क साधायला तयार नसून कराडमध्ये बसून कामकाज हकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उंडाळे विभागात पोलिसांचा दरारा उरला नसल्याचे दिसून येत आहे. तेव्हा पोलिस प्रशासनातील वरिष्ठांनी उंडाळे येथे पोलीस कायम स्वरुपी राहतील, अशी व्यवस्था करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
ग्रामपंचायतीचे CCTV फक्त शोपीस
उंडाळे ग्रामपंचायतीने 25 हजार रुपये खर्च करून मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी CCTV बसवले आहेत. ते नादुरुस्त आहेत, म्हणून त्यावर चक्क 26 हजार रुपये खर्च करून दुरुस्ती केल्याचा ग्रामपंचायत दप्तरी खर्च टाकला असल्याचा कारणावरून एक वर्षापूर्वी ग्रामसभेत युवकांनी आवाज उठवला होता. तेव्हा आपला भोंगळ कारभार बाहेर येईल म्हणून ग्रामसभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे बसवण्यात आलेले CCTV फक्त शोपीस झाले असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.