अखेर! माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी शिवबंधन बांधले

कराड | विशाल वामनराव पाटील
कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी अखेर मातोश्रीवर जावून शिवसेनेत (ठाकरे गट) शिवबंधन बांधून प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसापासून उध्दव ठाकरे यांच्या गटात चर्चेत असलेला पक्षप्रवेश आज पार पडला. इंद्रजित गुजर यांच्या पक्ष प्रवेशामुळे ठाकरे गटाला एक सक्षम नेतृत्व मिळाले असल्याची भावना व्यक्त होत आहे.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत इंद्रजित गुजर यांच्यासह राकेश पवार, राजकुमार (भाऊ) पाटील यांनी प्रवेश केला. यावेळी माजी पर्यावरण मंत्री व आमदार आदित्य ठाकरे, माजी आमदार दगडूदादा सकपाळ, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बानुगडे, जिल्हाध्यक्ष भानुप्रताप उर्फ हर्षद कदम, सुपनेचे उपसरपंच अजित जाधव, शहरप्रमुख शशिराज करपे, युवासेना शहर प्रमुख अक्षय गवळी यांच्यासह उध्दव ठाकरे गटातील कराड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले, कराडला इंद्रजित गुजर यांच्या पक्ष प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे. अडचणीच्या काळात पक्ष बांधणीत साताऱ्यात जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांचे काम चांगले असून निः स्वार्थीपणे पक्षप्रवेश होत आहेत. आगामी काळात या लोकांना ताकद देण्याचे काम शिवसेना काम नक्की करेल.