महाबळेश्वर, नवजा व कोयनेला पावसाचा जोर वाढला
पाटण | कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर, नवजा भागात पावसाचा जोर वाढला आहे. आज दिवसभरात कराड, पाटण, सातारा, वाई, जावली व महाबळेश्वर तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात 25 हजार 879 क्युसेस पाण्याची आवक वाढली आहे. महाबळेश्वर येथील वेण्णालेक सांडवा भरून वाहू लागला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर, नवजा येथे एक हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा पार केला. गेल्या 24 तासांत कोयनानगर येथे 34, नवजाला 26 आणि महाबळेश्वरला 17 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना जलाशयाची पाणीपातळी 2055.02 फूट झाली असून, एकूण पाणीसाठा 19.94 टीएमसी झाला आहे. जलाशयात प्रतिसेकंद 25 हजार 879 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
गेल्या दोन दिवसापासून पावसाने सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाची रिपरिप पहायला मिळत आहे. माण- खटाव, कोरेगाव व फलटण या भागात अद्याप पावसाची जोरदार हजेरी नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. पेरण्या काही ठिकाणी अजूनही रखडल्याचे चित्र दिसत आहे.