POLITICS : आख्खं मंत्रिमंडळच नव्हे, आमदारही गॅसवर

विशेष | विशाल वामनराव पाटील
महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस युती सरकार येवून वर्षपूर्ती झाली तरी मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. तर शिंदे- फडणवीस- अजित पवार यांचे त्रिशूळ सरकार येवून आता 15 दिवस लोटायला आले आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार होणार निश्चित आहे, अगदी पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार व खाते वाटप होणार हे निश्चित झाल आहे. परंतु, या विस्ताराआधी आख्खं मंत्रिमंडळ गॅसवर असल्याचे खुद्द मंत्रीमहोदय खासगीत सांगत आहेत. कारण विस्तारात अनेकांची पालकमंत्री पद दोनवरून एकवर येणार आहेत अन् काहींची खाती कमी होणार असल्याने डोळा ठेवलेली खाती राहणार की जाणार या परिस्थितीचा अंदाज लागत नाही. अशा त्रिशूळ सरकारमध्ये त्रिकोणी पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि 9 मंत्र्यांनी शपथ घेतली अन् मंत्रिमंडळ विस्तार होणार हे निश्चित झाले. परंतु, अशावेळी जे वर्षभरापासून मंत्री होण्याच्या रांगेत आहेत, त्यांना खरा मोठा झटका बसला. कारण विस्तार लवकरच होणार असे सांगून वर्ष उलटले अन् विस्तार झाला तो राष्ट्रवादीतून अजित दादांसोबत आलेल्याचा. या परिस्थितीत जे रांगेत उभे होते, ते त्याच जागेवर उभे आहेत. तेथून ते एकतर माघारी जायचं तर सरकारमधून बाहेरच अन्यथा मंत्रिपद नक्की घ्यायच अशा स्थितीत उभे राहिले आहेत. तेव्हा या परिस्थितीला तोंड देणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कठिण होवू लागले असल्याने त्यांनी दिल्ली गाठली आहे.
या सर्व घडामोडीत ज्यांनी वर्षभर मंत्रीपदे भोगली आहेत. त्यांची काही खाती कमी होणार आहेत. खाती कमी होणार यासाठी मंत्र्यांनी मनाची तयारी करण्यास सुरूवात केली आहे. परंतु, महत्वाची खाते आणि राष्ट्रवादीने मागितलेल्या सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यातील पालकमंत्री पदामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचीही काही खाती आता दुसऱ्या मंत्र्यांना देण्यात येणार आहेत. यामध्ये आता अजित पवार यांचा गट वाढल्याने शिवसेना शिंदे गटात नाराजी असल्याचे आ. बच्चू कडू यांनी जाहिररित्या बोलून दाखवली. आ. बच्चू कडू यांनी बोलले खरे असून शिवसेना शिंदे गटच नव्हे तर मंत्रिपदाच्या रांगेतील सर्वचजण अजित दादांच्या गटामुळे नाराज आहेत. परंतु, सरकारमध्ये विस्ताराआधी बोलल्यास रांगेतून बाजूला जावू या भीतीमुळे अनेकजण बोलत नाहीत. या विस्तारानंतर ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, ते नाराजी व्यक्त करणार हे निश्चित. तसेच 10 आॅगस्टला अपात्रतेचा निर्णय लागणार आहे. दुसरीकडे अजित पवार गटाकडे अद्याप 36 आमदारांची बेरीज झालेली नाही. या घडामोडीमुळे अपात्र ठरणार का?, अजित पवार आवश्यक आकडा गाठणार का? मंत्रिपद मिळणार का? असलेली महत्वाची खाती राहणार का? आणि रांगेत उभे राहिल्यासारखे मिळणार की पुन्हा रिकामे हात राहणार अशी परिस्थिती त्रिशूळ सरकारमध्ये असल्याने केवळ आख्खं मंत्रिमंडळच नव्हे तर सरकारमधील आमदार गॅसवर असल्याचे बोलले जात आहे.