कराडामध्ये 20 वर्षीय युवक रंगेहाथ सापडला : चोरीच्या 8 दुचाकी जप्त
कराड | चोरीची दुचाकी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे पोलिसांनी तपास केला असता त्याने साथीदारासह चोरलेल्या तब्बल आठ दुचाकी आढळून आल्या. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आले आहे. प्रतीक संजय माने (वय- 20, रा. किर्लाेस्करवाडी, ता. पलूस, जि. सांगली) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहरातील बैलबाजार मार्गावर एकजण चोरीची दुचाकी विकण्यास येणार असल्याची माहिती सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्यासह पथकाने सापळा रचला. त्याठिकाणी चोरीची दुचाकी विक्री करण्यास आलेल्या प्रतिक माने याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने व त्याच्या साथीदाराने तब्बल आठ दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. कराड, पलुस, इस्लामपूर, कासेगावच्या हद्दीतून त्यांनी या दुचाकी चोरल्या होत्या. पोलिसांनी ठिकठिकाणी छापा टाकून या आठ दुचाकी हस्तगत केल्या. तसेच प्रतीक माने याच्या साथीदाराचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोउनि विश्वास शिंगाडे, पतंग पाटील, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, संजय शिर्के, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सचिन साळुंखे, सनी आवटे, अजित कर्णे, अमोल माने, राजु कांबळे, मुनीर मुल्ला, शिवाजी भिसे, मनोज जाधव, धीरज महाडीक, मयूर देशमुख, वैभव सावंत, मोहसीन मोमीन, चालक संभाजी साळुंखे यांनी केली.