कोर्टीजवळ रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात कार कोसळली : अपघातात 7 जण जखमी
उंब्रज | पुणे- बेंगलोर आशियाई महामार्गावर कोर्टी (ता- कराड) गावच्या हद्दीत पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास कारला भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरून सेवा रस्त्याला खोदण्यात आलेल्या खड्ड्यात येऊन कोसळी. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने पहाटेच्या वेळेस कोर्टी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमी सांगली व मिरजचे रहिवाशी आहेत. कार पुण्यावरून सांगलीला निघाली होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोर्टी गावचे हद्दीत सद्यस्थितीत महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी सुमारे दहा फूटांवर खोल चरी मारून तेथील खड्ड्यात आरसीसी बांधकाम करून सळ्या लावण्यात आले आहेत. याच ठिकाणी आज मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी पुण्यावरून सांगलीकडे निघालेल्या कारला भीषण अपघात झाला. कार रस्त्याकडेच्या धडकून पलटी होवून सेवा रस्त्यावर सुरू असलेल्या खड्ड्यात येऊन आदळली.
या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. कारमधून सुमारे सात जण प्रवास करत होते. यात दोन महिलांचा समावेश असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच अन्य दोघेजण व तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर मोठा आवाज झाला त्यामुळे पहाटेच्या समारास तेथील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढून रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारासाठी कराड येथे पाठविण्यात आले. दरम्यान, घटनास्थळी उंब्रज पोलिसांनी पाहणी केली आहे. मात्र, सदर अपघाताबाबत उंब्रज पोलिसांकडे कोणतीही माहिती उपलब्ध झाली नव्हती.