पाटण येथे प्रांत कार्यालयासमोर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी

पाटण | महाराष्ट्रात 8 नोव्हेंबर 2019 पासून पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे. हा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. मात्र हा कायदा पुरेसा सक्षम आणि चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तो आता कुचकामी ठरला आहे. त्यामुळे या कायद्याची प्रभावीपणे अमलबजावणी व्हावी याशिवाय पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांविरूध्द कडक कारवाई व्हावी यासाठी आज गुरुवारी पाटण येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अ.भा.मराठी पत्रकार परिषद सलग्न पाटण तालुका पत्रकार संघाने राज्यसरकारच्या पत्रकारांणविषयीच्या धोरणांचा निषेध करीत पत्रकार संरक्षण कायद्याची केली.
पुरोगामी महाराष्ट्रात लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर सततचे जीवघेणे हल्ले होत आहेत. अशा भ्याड हल्ल्यांचा राज्य शासनाकडून गंभीर दखल घेतली जात नाही अथवा हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जात नाही. पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा महाराष्ट्र सरकारने 2019 साली अमलात आणला असलातरी त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष पोलिस विभागाकडून केली जात नाही. संरक्षण कायदा असून त्याची अमलबजावणीच होत नसेलतर अशा कायद्याची होळी करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटनांनी घेतला आसताना अ.भा.मराठी पत्रकार परिषद सलग्न पाटण तालुका पत्रकार संघाने प्रांत कार्यालयासमोर गनिमी काव्याने सरकारचा निषेध करत कुचकामी कायद्याची होळी केली असल्याचे यावेळी अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी सांगितले.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांच्या निर्देशनानुसार संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली आसताना पाटण तालुका पत्रकार संघाने आज दुपारी 1 वा. च्या सुमारास तहसिल कार्यालयासमोर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यासाठी पत्रकार जमा झाले. यावेळी पाटण पोलिस स्टेशनला नवीनच रुजू झालेले सहा. पो.नि. संदिप कामत, नायब तहसिलदार तुषार बोरकर यांनी शासकीय कार्यालयाच्या आवारात होळी करण्यासाठी अटकाव केला. शेजारी न्यायालय असल्याने आंदोलन करता येणार नाही असे सांगितले. पत्रकारांनी न्यायालय व तहसिल कार्यालयाच्या आवारात प्रशासनाला सहकार्याची भूमिका दाखवत अखेर प्रांतकार्यालयाच्या आवारात गनिमी काव्याने पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करत आंदोलन यशस्वी केले. यावेळी पाटण तालुका पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष योगेश हिरवे, नितीन खैरमोडे, माजी अध्यक्ष शंकर मोहिते, विक्रांत कांबळे, भगवंत लोहार, जालिंदर सत्रे, संजय कांबळे, जयभीम कांबळे, सुरेश संकपाळ, दादा पवार, प्रविण जाधव, श्रीगणेश गायकवाड,खाशाबा चव्हाण आदी पत्रकारांची उपस्थिती होती.