कराडात दुचाकीला कट मारल्याने अपहरण करुन दोन युवकांना बेदम मारहाण : सातजणांवर गुन्हा दाखल

कराड | दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरुन सातजणांनी युवकाचे अपहरण करुन त्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहृत युवकासह अन्य एकजण आरोपींच्या मारहाणीत जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अक्षय रमेश औंधे (रा. शिवाजीनगर एमएससीबी रोड ओगलेवाडी) याने याबाबतची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून यश सोनवणे, जयदीप देशमुख, शुभम जाधव, इंद्रजीत देसाई यांच्यासह इतर तीन अनोळखी युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय औंधे याचा चुलत भाऊ रणजीत सुरेश औंधे व त्याचा मित्र अकीब आयाज मुलाणी हे दोघे शहरातील एका खाजगी क्लासला एकत्र येतात. दि. 23 आॅगस्ट रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रणजीत व त्याचा मित्र अकीब हे दोघे दुचाकीवरून पांढरीचा मारुती मंदिरापासून मुख्य बाजारपेठेकडे निघाले होते. त्यावेळी दुचाकी पुढे नेत असताना कट मारल्याच्या कारणावरून काही युवकांशी दोघांचा वाद झाला. वाद सुरू असतानाच रणजीत औंधे याचा मित्र ओमकार जाधव हाही त्या ठिकाणी आला. वाद सुरू असतानाच शिवीगाळ करण्यात आल्याने मारामारीसुद्धा झाली होती. त्यानंतर त्याच रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवरून सहा युवक अक्षय औंधे याच्या घराजवळ गेले. त्यावेळी अक्षयने वाद मिटला असून आपण उद्या भेटून चर्चा करू, असे सांगितले. त्यामुळे ते सहा युवक परत कराडच्या दिशेने गेले.
दुसऱ्या दिवशी पुन्हा एका मोबाईलवरून फोन करून अक्षय औंधे याला ओमकार व अकीब यांना घेऊन यावे. आम्ही त्यांना मारहाण करणार आहोत, असे सांगण्यात आले. यावेळी मोबाईलवर बोलणाऱ्या युवकांनी आपले नाव शुभम जाधव असल्याचे सांगितले. याच कालावधीत सायंकाळी साडेसात वाजता रणजीत औंधे व अकीब हे दोघे एमएसईबी रोडवर आशा औंधे यांच्या घराशेजारी बसले होते. त्यावेळी संशयीत युवकांनी एका जीपमधून येत रणजीत व आकीब यांना जबरदस्तीने जीपमध्ये बसवून कराडमध्ये आणले. जीपमध्ये असतानाच अकीब याला पट्ट्याने आणि फायटरने मारहाण करण्यात आली. त्यानंतर आकिब याला कृष्णा नाका परिसरात सोडून देत रणजीत याला जीपमधून अज्ञातस्थळी नेण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच रणजीत याचा चुलत भाऊ अक्षय व त्याच्या सहकाऱ्यांनी रणजीतचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. त्यामुळे याप्रकरणी अक्षय औंधे याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पाचजणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
जीपमधून पळवून नेलेल्या रणजीत औंधे याची संबंधित युवकांनी पाच तासाने सुटका केली. या कालावधीत घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांनी ठिकठिकाणी शोध मोहीम राबवली. तसेच याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.