Satara News : डंपरच्या धडकेत युवक जागीच ठार तर युवती गंभीर जखमी

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
सातारा जिल्ह्यातील म्हसवड (ता. माण) जवळ असणाऱ्या मायणी चौकात दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या डंपरने जोरदार धडक दिल्याने युवक जागीच तर युवती गंभीर जखमी झाली. या अपघातातील दुचाकीवरील दोघेही सातारा शहरातील असून जखमी युवतीला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, म्हसवड येथे डंपरच्या धडकेत दुचाकीवरील अभिषेक सुनिल जाधव (रा. करंजे- सातारा) यांच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेली युवती स्नेहल जयवंत सावंत हिच्या पायावरून डंपरचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या अपघातानंतर घटनास्थळावरून डंपर चालक फरार झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी म्हसवड पोलीस दाखल झाले असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत..अपघातग्रस्त युवतीला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर घटनेची माहिती म्हसवड येथील लोकांना कळताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अधिक तपास म्हसवड पोलिस करत आहेत.