मी आरोग्य मंत्री नाही : साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि पत्रकाराच्यांत खडाजंगी (Video)
सातारा प्रतिनिधी । वैभव बोडके
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा रूग्णालयाचा आज आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि पत्रकार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. आरोग्य विभागाच्या भरती विषयावरून निर्माण झालेल्या खडाजंगीवरती माझंचं म्हणणं बरोबर असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले. यानंतर बराच काळ पत्रकार आणि पालकमंत्री आमनेसामने आलेले दिसून आले. आरोग्य विभागाच्या भरतीविषयी प्रश्न विचारताच, मी आरोग्य मंत्री नसल्याचे पालकमंत्री म्हणाले.
सातारा येथील स्व. क्रातींसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय या ठिकाणी पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालय परिसर, अतिदक्षता विभाग, मेडिकल स्टोअर्स आदी सर्व ठिकाणी भेटी दिल्या. मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध असणारा औषधसाठा यांचीही माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधिक्षक समीर शेख, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रविंद्रनाथ चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज कर्पे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. रुग्णालय भेटीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी आढावा घेण्यात आला.
शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे रुग्ण हे सर्वसामान्य परिस्थितीतील असतात. त्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून, नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनांची पुनरावृत्ती आपल्या जिल्ह्यात होवू नये, यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. प्रत्येक शासकीय रुग्णालयात सहा महिने पुरेल इतका औषधसाठा उपलब्ध ठेवावा. जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये अशा सर्व शासकीय रुग्णालयांच्या अद्ययावतीकरणासाठी व सक्षमीकरणासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री, वैद्यकीय उपकरणे यांच्यासाठी आदर्श प्रणाली जिल्हा प्रशासनाने तयार करावी. रुग्णालयांनी त्या प्रणालीनुसार मागणी करावी. त्यांना तात्काळ निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.