कार्वेतील एकाकडून मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाची फसवणूक
कराड | चांगला परतावा देण्याचा नावाखाली मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाची तीस हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एकावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली दिलीप थोरात (रा. कार्वे, ता. कराड) यांनी याबाबतची फिर्याद पोलिसात दिली. जयवंत भार्गव थोरात (रा. कार्वे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्वे येथील वैशाली थोरात या मोलमजुरी करतात. सन 2009 साली गावातील जयवंत थोरात हा वैशाली थोरात यांच्या घरी आला. त्याने एका शासकीय योजनेत वार्षिक पाच हजार रुपये गुंतवा, असे वैशाली यांना सांगितले. दरवर्षी पाच हजार रुपये अशी सहा वर्ष गुंतवणूक केल्यास 30 हजार रुपये जमा होतील आणि सहाव्या वर्षी त्या मोबदल्यात तुम्हाला 45 हजार रुपये मिळतील, असे त्याने सांगितले. जयवंत थोरात याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून वैशाली थोरात यांनी 2009 सालापासून 2015 सालापर्यंत दरवर्षी पाच हजारप्रमाणे 30 हजार रुपये दिले. जयवंत थोरात याने त्याच्या पावत्याही दिल्या.
योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर वैशाली थोरात यांनी रक्कम मागितली असता, जयवंत थोरात याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर 27 आॅगस्ट रोजी वैशाली थोरात या पैसे मागण्यासाठी गेल्या असता जयवंत थोरात याने शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत वैशाली थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयवंत थोरात याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भैरीनाथ कांबळे तपास करीत आहेत.