सातारा जिल्ह्यात शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकरी दाम्पत्याचा धारधार शस्त्राने खून
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
साताऱ्यातील आंधळी येथे शेतात गेलेल्या पाणी देण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याचा अज्ञाताने धारदार शस्त्राने खून केल्याची घटना आज समोर आली आहे. सदरील घटना शनिवारी रात्रीची घडली असून रविवारी सकाळी 11 अकरा वाजण्याच्या सुमारास परिसरातील शेतकरी शेतात जात असताना रक्ताळलेल्या अवस्थेत पती- पत्नीचे पडलेले मृतदेह आढळून आले. संजय रामचंद्र पवार (वय- 49 ) व मनीषा संजय पवार (वय- 45) अशी दाम्पत्याची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरुन आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आंधळी (ता. माण) येथील संजय पवार आणि मनिषा पवार हे दाम्पत्य शनिवारी रात्री दहानंतर शेतात पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यास गेले होते. रात्री साधारण दहा ते अकरा वाजण्याच्यादरम्यान अज्ञाताने धारदार शस्त्राने डोके, मान, गळ्यावर वार करून या दाम्पत्याचा खून केल्याची घटना घडली आहे. खून कोणत्या कारणानं झाला हे अद्याप अस्पष्ट असून शस्त्रासह संशयित आरोपी फरार झाला आहे.
आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास परिसरातील शेतकरी शेतात जात असताना स्त्री आणि पुरुषाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर ही माहिती आंधळी गावच्या पोलीस पाटलांनी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पाहून पाहणी करून घटनेचा पंचनामा केला आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी दहिवडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी खुनाचे पुरावे सापडतात का, याची पाहणी केली. यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. पवार दांपत्याचा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, संशयित आरोपी लवकरच हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.