वराडेत तीन बिबट्या मुक्कामाला, वनविभाग सुस्त ; सीसीटीव्हीत कैद
कराड | वराडे (ता. कराड) येथे बिबट्यानी धुमाकूळ घातला असून शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या गावात फिरत होता. बिबट्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहेत. वराडेत एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन बिबट्यांचे वास्तव्य आहे. बिबटे महिन्याभरात अनेकदा सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आले आहेत. त्यामुळे बिबट्याची दहशत आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घराबाहेर कसे पडायचे, या चिंतेत ग्रामस्थ आहेत. वनविभागाने बिबटे पकडण्यासाठी गावात पिंजरे लावण्याची मागणी होत आहे.
वराडेत शुक्रवारी रात्री पुन्हा भक्ष्याच्या शोधात बिबटे गावात घुसले. सध्या बिबटे लोक वस्तीत बिनधास्त वावरू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण आहे. सीसीटीव्ही कॅमेरातही अनेकदा बिबटे एकत्रितपणे गावात घुसल्याचे अनेकदा दिसून आले. त्यामुळे ग्रामस्थांची पाचावर धारण बसली आहे. गणेशोत्सवात तर रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास गावात बिबट्या शिरला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी आरडाओरडा केला. ग्रामपंचायतीनेही या संदर्भात वनविभागाकडे पत्रव्यवहार करुन बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
कराड तालुक्यातील विजयनगर येथे गेल्या 8 दिवसापूर्वी 3 बिबट्या एकत्रित दिसले होते. त्यामुळे विजयनगर परिसरात भितीचे वातावरण आजही असल्याने डोंगरात जाण्यास लोक घाबरत आहेत. वराडे येथे बिबट्या मुक्कामालाच आहेत. तरीही वनविभाग त्यांना जेरबंद करत नसल्याने शेतकऱ्यांसह सामान्य लोकांच्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे.