राज्यात राजकारणातील घुसळण देवेंद्र फडणवीसांना दाबण्यासाठी : सदाभाऊ खोत यांचा आरोप
पत्रकारांच्या प्रश्नावर सदाभाऊंची घुसमट
कराड | आताच्या सरकारमध्ये नक्की कमांड कोणाची, कोणाला प्रश्न मांडायचा. सरकार आमचं असलं तरी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहाचायला कमी पडलं आहे. महाराष्ट्राच वाटोळं ही प्रस्थापित घराण्यांनी केलेलं असून त्यांना उध्दस्त केवळ देवेंद्र फडणवीस करू शकतात. राज्यात केवळ देवेंद्र फडणवीस हा एकमेव आश्वासक चेहरा असून बाकींच्यांनी रिंगण केलं आहे. आजच्या राजकारणातील घुसळण देवेंद्र फडणवीस या माणसाला दाबण्यासाठी सुरू असल्याचा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी अजित पवार आणि शिंदे गटासह विरोधकांवर केला आहे.
कराड येथे माजी मंत्री सदाभाऊ खोत माध्यमांशी बोलत होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच सरकारमध्ये सामील असलेल्या अजित पवार आणि शिंदे गटाचाही समाचार घेतला. त्या बरोबर भाजपाच्या अलीकडील राजकीय भूमिका आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत भाजपावर नाराजी व्यक्त केली. यावेळी माध्यमांसमोर मंत्री सदाभाऊ खोत यांची चांगलीच घुसमट झाल्याचे पहायला मिळाले.
माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसच्या काळात शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे झाले. गेल्या 70 वर्षात शेतकऱ्यांची व्होटबॅंक करता आली नाही. परंतु ती आता तयार केली जाईल. व्होटबॅंक नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आला आहे. सन 2019 साली शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे सरकारने आणले होते, मात्र दुर्देवाने ते प्रस्थापितांच्यामुळे मागे घ्यावे लागले.