कराडात मराठा एकवटला : तीन युवकांचा 50 फुटी होर्डिंगवर चढत सामूहिक आत्मदहनाचा इशारा, पोलिसांची धावपळ उडाली

कराड | मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कराड मध्ये मराठा समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. कराड मधील दत्त चौकातुन मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चात मराठा बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा संपेपर्यंत कोणी पाणी पिणार नाही आणि काही खाणार नाही असा पण करण्यात आला होता. आरक्षण मिळाल्या शिवाय माघार नाही, अशा घोषणा मराठा समाजाच्या वतीनं दिल्या जात होत्या. मोर्चा संपल्यानंतर आरक्षण मिळावं, या मागणीसाठी कराडातील दत्त चौकातील 50 फूटी होर्डींगवर 3 तरुणांनी चढुन आंदोलन केलं. या अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
कराड तालुक्यातील भूषण जगताप, गणेश पवार आणि विक्रम गायकवाड या तीन युवकांनी 50 फुटी होर्डींगवर चढून हे आंदोलन केले. बराच वेळ हे आंदोलक खाली उतरायला तयार नव्हते, मात्र आंदोलनकर्त्यांना विनवणी करुन पोलिसांनी खाली उतरवलं. या आंदोलनकर्त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. मराठ्यांचे खासदार, आमदार, मंत्री असून देखील मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी का लागत नाही असा सवाल करत भाजपचे राज्यात, केंद्रात सरकार आहे. मग इतर कायदे होतात, मग मराठा आरक्षणाचा कायदा का केला जात नाही असा सवाल आंदोलनकर्त्यांनी विचाराला आहे. मराठा समाजाला गृहीत धरू नका आत्ता पर्यंत 150 आत्महत्या झाल्या आहेत. जरांगे पाटील यांच्या जीविताला जर काय झाले तर सामूहिक आत्मदहन करू असा इशारा देखील या आंदोलकांनी दिला आहे. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली अन् त्यानंतरच होर्डिंगवरून खाली येण्याची विनंती मान्य केली.
कराड तालुका व शहर पोलिसांनी मोठा पोलिस फाैजफाटा ठेवला होता. मराठा सकल समाजाने अंत्यत शिस्तबध्द, शांततेचा संदेश मोर्चात दिला. मोर्चात सहभागी महिला, तरूण- तरूणी आणि जेष्ठांनी भगवे वादळाप्रमाणे मोर्चा काढला मात्र कोणताही अनुचित प्रकार केला नाही. छ. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन आणि पुष्पहार अर्पण करून कराड शहरातील दत्त चाैकातून मोर्चाला प्रारंभ झाला. पुढे चावडी चाैक, जोतिर्लिंग मंदिर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पुष्पहार अर्पण करून पुढे महात्मा फुले यांनाही अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कोर्ट परिसरात पूर्ण शांतता ठेवत कोणतीही घोषणा न देता मोर्चा पुढे दत्त चाैकात मार्गस्थ झाला. तेथून पुढे कराड तहसील कार्यालय याठिकाणी प्रातांधिकारी आणि तहसिलदार यांना महिलांनी निवेदन दिले.