कराड शहरातून कत्तलसाठी डाबून ठेवलेल्या 31 जनावरांची सुटका

कराड | शहरातील सूर्यवंशी मळा, आदर्श कॉलनी येथे 31 जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. गुरुवारी रात्री उशिरा सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत या जनावरांची सुटका केली. या प्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शकील जहांगीर मुलाणी (रा. शनिवार पेठ, मार्केट यार्ड- अंगणवाडी जवळ रेव्हेन्यू कॉलनी कराड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयताचे नाव आहे. शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली तसेच पोलिसांबरोबर जाऊन गुरुवारी रात्री उशिरा येथील आदर्श कॉलनीत छापा टाकला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील सूर्यवंशी मळा, आदर्श कॉलनी येथे शकील मुलाणी याने कत्तल करण्याच्या उद्देशाने 31 जनावरांना ठेवले होते. यावेळी पोलिसांना पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे गोवंशीय जनावराची कत्तल करण्याच्या उद्देशाने एक लाख तीस हजार रुपये किमतीची 31 जनावरे बांधून ठेवली असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी काकासाहेब जाधव व अन्य कार्यकर्त्यांच्या मदतीने जनावरांची सुटका करून त्यांना करवडी येथील गोशाळेत पाठवण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी शकील मुलाणी याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.