मल्हारपेठ – पंढरपूर रस्त्यासाठी 480 कोटी मंजूर : रामकृष्ण वेताळ
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
सातारा जिल्ह्यातील पाटण, कराड, खटाव, माण या तालुक्यातून जाणारा मल्हारपेठ- पंढरपूर राज्य मार्गासाठी महाराष्ट्र सरकारच्यावतीने 480 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण रस्त्यासाठी मोठ्याप्रमाणात निधी मिळाल्याने या समस्या सुटणार आहेत. चार तालुक्यातील प्रवाशांना गतिमान प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी दिली.
मल्हारपेठ ते मायणी पंढरपूर हा राज्यमार्ग क्रमांक 143 दुरुस्तीची आवश्यकता होती. मागील अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू होते.आज अखेर महायुती सरकारने या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने या रस्त्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघाली आहे. या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आ. जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र वायकर यांच्याकडे मागणी केली होती. सातत्याने शासन स्तरावर या मागणीचा पाठपुरावाही केला आहे. या पाठपुराव्याला आता यश मिळाले असल्याने या रस्त्याची दुरावस्था कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. हा रस्ता सातारा लोकसभा मतदारसंघातील चार तालुक्यातून व तीन विधानसभा मतदारसंघातून जात आहे. पाटण, कराड, खटाव माण या चार तालुक्यातील नागरिकांना या रस्त्यामुळे सुविधा प्राप्त होणार आहेत.महायुती सरकारने हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कराड तालुका भाजपा व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वतीने शासनाचे आभार मानण्यात येत आहेत.
निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान
महायुती सरकार हे गतिमान निर्णयासाठी प्रसिद्ध आहे. या रस्त्याच्या कामासाठी आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर 480 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या कामासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, नेते मनोज घोरपडे यांचेही सहकार्य लाभले.
रामकृष्ण वेताळ
प्रदेश सचिव भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा.