रेठरे खुर्दचे जवान अनिल कळसे यांना मणिपूर येथे वीरगती
कराड | रेठरे खुर्द (जि. सातारा) येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले अनिल दिनकर कळसे यांना मणिपूर येथे सेवेत असताना वीरगती मिळाल्याचे वृत्त सकाळी गावात समजले. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुले असा परिवार आहे. त्यांच्या वीरगतीची बातमी गावात धडकताच गावकरी शोकसागरात बुडाले. उद्या (शनिवार) सकाळी त्यांचे पार्थिव गावात आणले जाईल, अशी माहिती मिळाली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, रेठरे खुर्दचे सुपुत्र अनिल कळसे हे मणिपूर येथे भारतीय सैन्यदलात हवालदार म्हणून देशसेवा बजावत होते. भारतीय सेनेतील बॉम्बे इंजिनियर ग्रुपमधील 267 इंजिनिअर रेजिमेंटमध्ये सद्या ते कार्यरत होते. 29 सप्टेंबर 2000 साली ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. 2017 साली ते सैन्यातून निवृत्त झाले होते. परंतु त्यांनी सेवा वाढवून घेतली होती. पुढील वर्षी ऑगस्टमध्ये ते सेवेतून निवृत्त होणार होते.
पुढील महिन्यात ते सुट्टीवर येणार असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना कळवले होते. परंतु आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी धडकताच गावकरी शोकसागरात बुडाले. याबाबत ग्रामस्थांनी सांगितले की, काल दुपारी मणिपूर येथील सैनिक तळावर जेसीबीच्या सहाय्याने काम सुरू होते. जवान अनिल कळसे हे तेथे असताना त्यांच्या अंगावर झाड कोसळल्याने ते तेथेच कोसळले. व त्यांना गंभीर दुखापत झाल्याने वीरगती प्राप्त झाली. आज सकाळी ही दुःखद बातमी गावात समजली. गुरुवारी सायंकाळपर्यंत त्यांच्या शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू होती. ती रात्री उशिरा पूर्ण झाली. उद्या (शनिवारी) त्यांचे पार्थिव सकाळी गावी येणार आहे. तेथील जाई मोहिते प्रशालेजवळ अंत्यविधी होणार आहेत.