महायुतीत दरार : आ. मकरंद पाटलांची मदन भोसलेंवर टीका
मदन भोसले माझे राजकीय विरोधकच
कराड – माझी विचारधारा, माझा पक्ष आणि चिन्ह ठरलेलं आहे. तेव्हा कोण कुठे जातयं याचा मी विचार करत नाही. माझा मतदारसंघ मी विकासात्मक बांधलेला आहे. मूळात मदन भोसले हे माझे राजकीय विरोधकच आहेत. त्यामुळे ते कुठल्या पक्षात गेले अन् कुणाला भेटल्याने मला काहीच फरक पडत नसल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी म्हटले आहे. कराड येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी आ. मकरंद पाटील यांनी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मदन भोसले यांच्या भेटीवर भाष्य केले. आ. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आता महायुतीत वाई विधानसभा मतदार संघात वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महायुतीतून राज्यसभेवर राष्ट्रवादी अजित पवार गटातून सातारा जिल्हा बॅंकेचे चेअरमन नितीन काका पाटील यांची बिनविरोध वर्णी लागल्यानंतर प्रथमच कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आले होते. यावेळी भाजपचे युवा नेते मनोज घोरपडे, कराड पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, विजयसिंह यादव, सुपनेचे धनाजी पाटील, कराड तालुकाध्यक्ष जितेंद्र डुबल, राजेश पाटील- वाठारकर, स्मिता हुलवान आदी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या विकासचं खासदारचं व्हिजन काय…?
नवनिर्वाचित खासदार नितीन काका पाटील आज पहिल्यांदाच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आले होते. तेव्हा माध्यम प्रतिनिधींनी सातारा जिल्ह्याच्या विकासचं व्हिजन काय असा सवाल विचारताच… केवळ हात जोडले अन् आता चला म्हणाले. त्याच्या या उत्तराने खासदारकी मिळाली परंतु, जिल्ह्यासाठी काय करायचे यांचा विचार किंवा व्हिजनच नसल्याचे दिसून आले.
खासदार नितीन काका पाटील म्हणाले, अजित दादा शब्द पाळणार नाहीत, असे होतच नाही. दादांचा महाराष्ट्रात नावलाैकिक चालतो. जो शब्द दादा देतात तो दादा पाळतातच आणि शब्द पाळणारा नेता म्हणूनच दादांची अोळख आहे. आता संपूर्ण राज्याला समजलं दादा दिलेला शब्द पाळतात.