ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यविधानसभा 2024सातारा

शंभूराज देसाईंच शक्तिप्रदर्शन, पाटणला विरोधकाचं काय?

विशाल वामनराव पाटील

राज्यात विधानसभेची आचारसंहिता केव्हाही लागेल हे गृहित धरून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार तसेच महाविकस आघाडी आणि महायुतीकडून रणनीती आखण्यास सुरूवात झाली आहे. मतदार संघात अनेक विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन यानिमित्ताने प्रचाराला सुरूवात झाली असून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागल्या आहेत. पाटणला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केले. तसेच बंदूक ठासून शिकार करायला तयार असल्याचे म्हणत विरोधकांना आव्हान आ. देसाई यांनी दिले आहे. मात्र, विरोधी महाविकास आघाडीचं (पाटणकर गट) काय चालू आहे, असा प्रश्न आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित करत आहे.

पाटण विधानसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात पाटणकर गट बॅकफूटला जाताना पाहिला मिळालं. शंभूराज देसाई सत्तेत आणि मंत्रीपदावर असल्याने एक- एक पाऊल पुढे- पुढे जाताना दिसला. पाटण तालुक्यात आजही गटा- तटाच राजकारण असल्याने पक्षीय राजकारण जसे मोठ्या प्रमाणावर बदलते तसे पाटण मतदार संघात बदलले नाही. पाटणकरांची एक मोठी व्होट बॅंक त्याच्यासोबत आजही असल्याने देसाई गट सावध पाऊले टाकताना दिसत आहे. देसाई- पाटणकर गटात आरोप- प्रत्यारोप होणे हा राजकीय भाग आहेच. परंतु, सत्तेतील गट पुढे जात असताना विरोधक चिडीचूप असण्याने कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता वाढताना दिसत आहे. सत्तेत असताना सर्वांचेच समाधान होवू शकत नाही, तेव्हा देसाई गटातील नाराज लोकांना आपल्याकडे वळविण्यात विरोधक काहीच प्रयत्न करताना दिसत नाहीत. तेव्हा नक्की विरोधकाचं चाललयं काय असा सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या पाच वर्षापूर्वी पहिल्यांदा महाविकास आघाडीच सरकार उदयास आलं. तेव्हा शंभूराज देसाईंना गृहराज्यमंत्रीपद आणि वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं. अडीच वर्षांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री म्हटल्याप्रमाणे पैशाचं खात उत्पादन शुल्क कॅबिनेट मंत्रीपद आणि दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं. महाविकास आघाडीत असताना पाटणकर गटाचं भवितव्य अंधारमय असल्याचे बोलले जात होते. परंतु, फुटीमुळे पारंपारिक गट पुन्हा आमनेसामने आले. सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सत्यजित पाटणकरांनी विजय मिळवला. या विजयामुळे पाटणकर गट काही काळ चार्ज झालेला दिसला. मात्र, बाजार समितीत जवळपास 45 वर्षांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने सर्व शक्तीचा पुरेपूर वापर करून सत्तांतर घडवून आणले. या राजकीय घडामोडीमुळे सत्ताधारी देसाई गटाचा आत्मविश्वास सतत वाढताना दिसला.

सत्ता नसताना कार्यकर्ते सोडून जात असतानाही गटा- तटाच्या राजकारणामुळे पाटणकर गट आजही पाटण विधानसभा मतदार संघात चमत्कार घडवेल अशी आशा कार्यकर्त्यांना आहे. शिवसेना फुटीमुळे पाटणकर गटाला निष्ठावंत शिवसैनिकांची साथ मिळेल, अशी आशा बाळगली जात आहे. मूळ पाटण तालुका डोंगरदऱ्यात असून तारळे, कुंभारगाव, तळमावले, ढेबेवाडी, मोरणा, मल्हारपेठ- मरळी यासह कोयना भागातील मोठा वर्ग मुंबईत असतो. मुंबईतील मूळचा ठाकरेंचा शिवसैनिक महाविकास आघाडीला बळ देईल, असे बोलले जात आहे. या निष्ठावंत शिवसैनिकांनी पाटणकरांना साथ दिल्यास पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासाठी हा मोठा फटका असेल. मात्र, देसाई गट यासाठीही रणनीती आखेल, अशावेळी विरोधी पाटणकर गट कोणती रणनीती आखणार.

सत्यजित पाटणकर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे शक्तिप्रदर्शन करताना दिसलेले नाहीत. मात्र, छोटे- छोटे कार्यक्रम, भेटीगाठी यावर भर देताना गेल्या काही दिवसांपासून दिसू लागले आहेत. देसाई गटाकडे असलेली सत्ता, पद, पैसा, यंत्रणा याचा सामना करण्यासाठी आता पाटणकर गटालाही व्यूहरचना आखावी लागणार आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांची यंत्रणा योग्य पध्दतीने राबविणे हेच नेत्याच्या विजयाचे गणित असते. पाटण मतदार संघात गटा- तटाच्या राजकारणामुळे आणि महाविकास आघाडी धर्मामुळे निष्ठावंत शिवसैनिक काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.

पाटणकर मशाल की तुतारीवर लढणार?

पाटण विधानसभा मतदार संघात महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे आ. शंभूराज देसाई हे एकमेव उमेदवार असणार आहेत. तर पुढे त्याच्या विरोधात महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटणकर हेच निवडणुक रिंगणात असणार आहेत. पाटण मतदार संघ महाविकास आघाडीकडून उबाठा शिवसेना कि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळणार यावर पाटणकरांचे चिन्ह आणि पक्ष ठरणार आहे. त्यामुळे पाटणकर मशाल की तुतारीवर लढणार याबाबत अद्याप साशंकता आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker